अमुलकुमार जैन
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या नागाव ग्रामपंचायत हद्दीत समुद्रकिनारी असलेल्या जागेचा व्यवहार हा तीस कोटी रुपयांत होणार असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे.
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारा अलिबाग तालुका हा पर्यटन प्रिय म्हणून ओळखला जात असल्याने मुंबईसह देशभरातील धनदांडगे उद्योगपती यांना भुरळ पाडली आहे. अलिबाग तालुक्यातील मांडव्यापासून थेट रेवदंडापर्यंत अनेकांनी जमिनी खरेदी केल्या आहेत. मात्र, येत्या काही दिवसांत तालुक्यातील पर्यटनप्रिय तसेच मंदिराची नगरी असणाऱ्या नागाव ग्रामपंचायत हद्दीतील समुद्रकिनारी असणाऱ्या तीन एकर जागेची विक्री होणार आहे. सदर जागेचा दर प्रति गुंठा पंचवीस लाख रुपये ठरला आहे. पंचवीस लाख रुपये गुंठा प्रमाणे तीन एकरमध्ये एकशे वीस गुंठे जागा असल्याने हा व्यवहार तीस कोटीपर्यंत गेला असून या जमिनीचा व्यवहार हा दिल्लीत झाला असल्याची माहिती मिळाली असून काही रक्कम नजराणा म्हणून देण्यात सुद्धा आली आहे.
तीस कोटीच्या व्यवहारात किती रक्कम ही प्रत्यक्षात दाखविण्यात येईल आणि किती रक्कम ही रोख स्वरूपात दिली जाणार याची उत्सुकता लागली आहे. सदर जमीन खरेदी करणारा हा कोणी मोठा उद्योगपती नसून तालुक्यातील स्थानिकच असल्याची चर्चा सुरू आहे.
