• Mon. Jul 28th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड जिल्ह्याचा क्रांतीविकास झाल्याशिवाय शांत बसणार नाही -ना. उदय सामंत

ByEditor

Oct 26, 2023

कडसुरे गावातील शुद्ध पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

शामकांत नेरपगार
नागोठणे :
भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून ‘हर घर नल’ ही संकल्पना संपूर्ण देशात राबविली जात आहे. रायगड जिल्ह्यात या योजनेसाठी 1236 कोटी रुपये निधी उपलब्ध झाल्यामुळे आता जिल्ह्यातील गावागावात मुबलक पाणी उपलब्ध होणार असून माझ्या सुचनांचा रिलायन्स व्यवस्थापनाने आदर केल्यामुळे सीएसआर फंडातून कडसुरे गावाला शुद्ध पाणी पुरवठा उपलब्ध झाला असल्यामुळे गावातील महिलांची पायपीट थांबली असल्याचे मला समाधान असून रायगड जिल्ह्याच्या तिजोरीची चावी माझ्याकडे असल्यामुळे रायगड जिल्ह्याचा क्रांतीविकास झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड, रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी नागोठणे जवळील कडसुरे येथे केले.

नागोठणे येथील रिलायन्स कंपनीने सीएसआर फंडातून 20 लाख रुपये खर्च करून कडसुरे गावाकरिता शुद्ध पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ बुधवारी (दि. 25) सायंकाळी ना. उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना ना. सामंत बोलत होते. यावेळी ना. सामंत यांच्या पत्नी सिने अभिनेत्री निलम शिर्के, कामगार नेते दिपक रानवडे, रोहा ता. प्रमुख ॲड. मनोज शिंदे, रिलायन्स नागोठणे युनिटचे उपाध्यक्ष गौतम मुखर्जी, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे, सीएसआर विभागाच्या वरदा कुलकर्णी, पोलीस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम, सपोनि संदिप पोमन, उपजिल्हा प्रमुख उद्धव कुथे, किशोर म्हात्रे, एकनाथ ठाकूर, विष्णू लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते विकास शिर्के, अरुण शिर्के, कडसुरे उपसरपंच रविंद्र शिर्के, पांडुरंग शिंदे, दत्तात्रेय शिर्के, दिलीप महाराज शिंदे, महेश शिंदे, भानुदास शिंदे, संदीप शिंदे, समाधान शिंदे, काशिराम गव्हंडकर, धनंजय महाडिक व अनिल शिंदे, रघुनाथ शिर्के, यशवंत शिर्के, किशोर शिर्के, संजय शिर्के, प्रकाश मोरे, प्रमोद मोरे, मनोज खांडेकर, मंगेश रावकर, निलम कुथे, वर्षा सहस्त्रबुद्धे, अमृता धनावडे आदींसह कार्यकर्ते व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुंडलिक ताडकर, प्रास्ताविक माजी सरपंच दत्तात्रेय शिर्के व आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते विकास शिर्के यांनी केले. दरम्यान, शुद्ध पाण्यासाठी गावातील महिलांची पायपीट थांबावी यासाठी पांडुरंग शिंदे, दिलीप महाराज शिंदे, दत्तात्रय शिर्के, महेश शिंदे, भानुदास शिंदे, संदीप शिंदे, समाधान शिंदे, काशिराम गव्हंडकर, धनंजय महाडिक व अनिल शिंदे आदी ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली.

ना सामंत मार्गदर्शन करताना म्हणाले की, नागोठणे पंचक्रोशीचा विकास करणे ही माझी जबाबदारी आहे. गावाचा विकास करण्यासाठी हेवेदावे बाजूला ठेवा. गाव एकजुटीने राहिला पाहिजे हे महत्वाचे आहे. निवडणुकीच्या वेळी आपल्या गावाचा व आपला विकास कोण करू शकतो कोण करत आहे याची जाण ग्रामस्थांनी ठेवली पाहिजे. माझ्याकडे रायगड जिल्ह्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत त्यामुळे तुम्ही माझा उपयोग करून घ्या. गावागावातील विकासासाठी मुख्यमंत्री ना. शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री ना. फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा व मी कटिबद्ध असल्याचे शेवटी ना. सामंत यांनी सांगितले.

ना. उदय सामंत कडसुरे गावाचे जावई

महाराष्ट्राचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांची पत्नी सिनेअभिनेत्री निलम शिर्के-सामंत या कडसुरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्तात्रेय शिर्के यांची पुतणी असून निलमताई या कडसुरे गावातील सुकन्या आहेत. त्यामुळे ना. उदय सामंत हे कडसुरे गावाचे जावई असल्यामुळे त्यांचे कडसुरे गावावर विशेष प्रेम असल्याचे दिसून येत असून कडसुरे गावाच्या विकासासाठी भरघोस निधी दिला जात आहे व यापुढेही दिला जाणार आहे.

गावातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश

रायगडचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या कार्यप्रणालीवर खूष होऊन गावातील क्रियाशील कार्यकर्ते संजय शिर्के, रघुनाथ शिर्के, यशवंत शिर्के, रुपेश शिर्के, अरविंद शिर्के, रोहिदास शिर्के, प्रमोद शिर्के, अविष्कार शिर्के, सर्वेश शिर्के आदींसह गावातील प्रमुख ५० कार्यकर्त्यांनी शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर केला. यावेळी सर्व प्रवेशकर्त्यांचे ना. उदय सामंत यांनी स्वागत करून पक्षात आपणास मानसन्मानाची वागणूक दिली जाईल व आपल्या अडचणी सोडविण्यासाठी मी कटीबद्ध असल्याची ग्वाही ना. उदय सामंत यांनी दिली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!