अमोल पेणकर
रोहे : रोह्याचे ग्रामदैवत श्री धाविर महाराजांच्या बुधवारी पहाटे सुरू झालेल्या पालखी सोहळयाची सांगता दुसऱ्या दिवशी गुरूवारी दुपारनंतर झाली. शहरात फिरून रोहेकरांना दर्शन देत आणि गावामध्ये बंधुभेटी करीत ३० तासांनंतर देव मंदिरात परतले. यावेळी पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर व पथकाने श्री धाविर महाराजांना पुन्हा सशस्त्र मानवंदना दिली. महाआरती आणि सेवेकऱ्यांचे मानपान कार्यक्रमानंतर पालखी उत्सवाची सांगता झाली.

परंपरेनुसार मंदिर ट्रस्ट आणि उत्सव समितीकडून रायगड पोलीस, महसूल विभाग, रोहा नगर पालिका, महावितरण विभाग, उत्सवाचे मानकरी आदींसह तीस तास पालखी उत्सवात अखंडपणे विविध प्रकारे सेवा देणाऱ्या सेवेकऱ्यांना प्रसादाचे नारळ भेट देत त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, ट्रस्टचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, कार्यवाह मकरंद बारटक्के, उत्सव समितीचे अध्यक्ष मयुर पायगुडे, विश्वस्त नितिन परब, माजी नगराध्यक्ष लालताप्रसाद कुशवाह, महेश सरदार, मोतीशेठ जैन, महेश कोलाटकर उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. जवळपास 30 तास चाललेल्या या पालखी सोहळ्यासाठी ट्रस्टचे प्रमुख पदाधिकाऱ्यांसह उत्सव समितीचे अध्यक्ष मयुर पायगुडे, कार्यवाह भुपेंद्र धाटावकर, उपाध्यक्ष नितेश जाधव, सहकार्यवाह दर्शन कदम, सहकार्यवाह निखिल अमृसकर, खजिनदार सुरज राऊत, सहखजिनदार विनोद पवार आदींसह सर्व पदाधिकाऱ्यांनी या पालखी सोहळ्यात अविश्रांत परिश्रम घेतले.

सेवेकरी तरुणांची अनवाणी पायाने 30 तास पालखी सेवा
या पालखी सोहळ्यात उत्सव समितीतील काही पदाधिकारी, गावातील तरुण सेवेकरी आणि धावीर भक्तांनी 30 तास पालखी समवेत अनवाणी पायाने आपली सेवा रुजू केली. पालखीसाठी विविध सेवा देणाऱ्यांसह मोठ्या संख्येने तरुण यामध्ये सहभागी झाले होते. दोन दिवस कडक उन्हात कसलीच तमा न बाळगता ही मंडळी पालखी समवेत सेवा देत होती. काहींच्या पायांना छोट्यामोठ्या जखमाही झाल्या. परंतु या तरुणांनी धावीर महाराजांचा जयघोष करीत पालखी दरम्यान आपली अखंडित आणि अविश्रांत सेवा रुजू केली.