• Mon. Jul 28th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

शेतकऱ्यांचा मोबदला मिळाला नाही तर गॅस पाईपलाईन उखडून फेकू!

ByEditor

Oct 26, 2023

भाजप तालुकाध्यक्ष राजेश भगत यांचा रिलायन्स प्रशासनाला इशारा
कर्जत तहसील कार्यालय येथे रिलायन्स प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

गणेश पवार
कर्जत :
रिलायन्स इथेन गॅस पाईपलाइ प्रकल्पामुळे शेतकऱ्यांची शेती नापीक झाली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना रिलायन्सकडून मोबदला मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. मात्र, तरीही रिलायन्स प्रशासनाकडून शेतकऱ्यांना अर्धवट नाहीतर अजिबातच मोबदला नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे पूर्वापारच्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या हातून गेल्यासारखी परिस्थिती आहे. तेव्हा प्रशासनाने आता शेतकऱ्यांचा अंत पाहु नये नाहीतर आता कायदा हातात घेऊन हि गॅस पाईपलाईन आमच्या शेतातून उखडून फेकून देऊ असा आक्रमक इशारा भाजप तालुकाध्यक्ष राजेश भगत यांनी कर्जत येथे रिलायन्स प्रशासनाला दिला आहे. रिलायन्स प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आजपासून आमरण उपोषण सुरु केले आहे, त्यावेळी भगत हे बोलत होते.

नागोठणे ते दहेज दरम्यान रिलायन्स इथेन पाईपलाईन हि कर्जत तालुक्यातून देखील गेली आहे. मात्र या पाईपलाईनमुळे बाधित झालेले शेतकरी यांना अजूनही मोबदला मिळाला नाही. शेतकरी आपल्या हक्कासाठी गेल्या ५ वर्षापासून लढत आहेत. मात्र अद्याप प्रशासन त्यातून मार्ग काढण्यास दिरंगाई करत असल्याने शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. आज दिनांक २६ ऑक्टोबर रोजी कर्जत तालुक्यातील रिलायन्स प्रकल्पबाधित शेतकरी केशव तरे हे कर्जत तहसील कार्यालयाबाहेर आपल्या मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. तर तालुक्यातील रिलायन्स प्रकल्पबाधित शेकडो शेतकरी याठिकाणी आपल्या न्यायासाठी जमले आहेत. आता हि लढाई आरपारची असून न्यायाशिवाय माघार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

रिलायन्स कंपनीची इथेन गॅस वाहक पाईपलाईन हि नागोठणे ते दहेज गुजरात इथपर्यंत गेलेली आहे. त्यापैकी कर्जत तालुक्यातील अनेक भागातून हि पाईपलाईन शेतातून गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती या प्रकल्पामुळे बाधित होऊन त्यांचे नुकसान झाले आहे. तेव्हा तालुक्यातील निकोप, अवसरे, बिरदोले, कोदिवले, दहिवली, वंजारपाडा, तळवडे, पिंपळोली, वाकस, नसरापुर, गणेगाव, कडाव, मार्केवाडी, सालवड कर्जत या गावातील रिलायन्स इथेन गॅस पाईपलाईन प्रकल्पग्रस्त शेतकरी जमिनीच्या मोबदल्यासाठी सनदशीर मार्गाने न्याय मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. या शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन देखील उभारले, असे असताना देखील त्यांना न्याय मिळाला नाही.

दरम्यान, रिलायन्स प्रशासनाने आम्हाला आजवर भूलथापा देऊन वेळ मारून नेली आहे. आम्ही गेल्या ५ वर्षापासून सनदशीर आणि लोकशाही मार्गाने पाठपुरावा करतो आहे. रिलायन्स इथेन गॅस प्रकल्पात दलाल मोठे झाले परंतु, ज्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी अधिग्रहीत झाल्या ते मात्र आजही मोबदल्यासाठी लढत आहेत. आमचा आजही प्रशासनावर विश्वास असून तेच यातून मार्ग काढतील व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा आहे. मात्र, आता या लढाईत न्याय मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही अशी भूमिका उपोषणकर्ते शेतकरी केशव तरे यांनी बोलून दाखवली आहे. तर शांततेच्या मार्गाने शेतकरी आंदोलन करून देखील त्याला न्याय मिळत नसेल तर हे आंदोलन आणखी तीव्र स्वरूपात केले जाईल. त्यावेळी हि जबाबदारी सर्वस्वी प्रशासनाची असेल तसेच या लढाईत शेतकऱ्यांच्या मागे भाजप पक्ष सक्षमपणे उभा असल्याची भावना भाजप किसान मोर्चाचे उपाध्यक्ष सुनील गोगटे यांनी बोलून दाखवली आहे.

यावेळी भाजपचे कर्जत तालुकाध्यक्ष राजेश भगत यांच्यासह संजय कराळे, विनायक पवार, युवा मोर्चाचे सर्वेश गोगटे यासह शेतकरी प्रल्हाद राणे, भास्कर तरे, एकनाथ तरे, सचिन शिंगे व मोठ्या प्रमाणात शेतकरी, महिला आदी उपस्थित होते. दरम्यान, गेली पाच वर्षे शेतकरी रिलायन्स प्रकल्पामुळे जमिनी बाधित झाल्याने आपल्या हक्कासाठी लढा लढत आहेत. मात्र आता त्यांच्या संयमाचा बांध तुटत आला आहे. तेव्हा आता तरी त्यांच्या हक्काचा मोबदला रिलायन्सकडून त्यांना मिळणार कि या आंदोलनाचा भडका उडण्याची प्रशासन वाट पाहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!