अनंत नारंगीकर
उरण : उरण शहर, एनएडी सारख्या प्रकल्पांना पाणी पुरवठा करणाऱ्या एमआयडीसीच्या पाईपलाईनला उरण रेल्वे स्थानकाजवळ मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे हजारो लिटर पाणी हे वाया जात आहे.
उरण शहरातील नागरिकांना व एनएडी सारख्या प्रकल्पांना रानसई धरणातून एमआयडीसीच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र एमआयडीसीच्या दुर्लक्षितपणामुळे वारंवार पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती लागण्याच्या घटनेत वाढ होत आहे. त्यात उरण शहराजवळ नव्याने निर्माण होऊ घातलेल्या उरण रेल्वे स्थानकाजवळील संरक्षण भिंतीच्या मध्यभागी असलेल्या एमआयडीसीच्या पाईपलाईनला गळती लागण्याची घटना मागील चार दिवसापासून घडली आहे. या गळतीकडे एमआयडीसीचे अभियंता तसेच रेल्वे प्रशासनाने जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.
यावर्षी राज्यात पडलेल्या पावसाच प्रमाण कमी असल्याने धरणातील पाणीसाठा हा कमी आहे. त्यामुळे यावर्षी नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना हा करावा लागणार आहे. त्यात एमआयडीसी व रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे रानसई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वारंवार होणाऱ्या गळतीमुळे पाणी साठ्यात झपाट्याने घट होणार आहे. तरी एमआयडीसी व रेल्वे प्रशासनाच्या अधिकारी वर्गाने झोपेचं सोंग न घेता पाईपलाईनला लागलेली गळती थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.