• Mon. Jul 28th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

म्हसळा शहरवासीयांसाठी ४३ कोटी खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेला तांत्रिक मंजुरी

ByEditor

Oct 26, 2023

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते होणार भूमिपूजन; आ. अनिकेत तटकरे यांनी दिली माहिती

वैभव कळस
म्हसळा :
निवडणुकीच्या पलीकडे जाऊन जो पक्ष काम करतो तो पक्ष म्हणजे अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. सर्व धर्मियांना बरोबर घेऊन सर्वसमावेशक विकास करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करीत असल्याचे मत आमदार अनिकेत तटकरे यांनी म्हसळा नगरपंचायतीमधील शहवासीयांसाठी केंद्र सरकारच्या अमृत योजने अंतर्गत ४३ कोटी रुपये खर्चाचे पाणी पुरवठा योजनेला तांत्रिक मंजुरी घेण्यात आली असल्याचे पत्रकार परिषद घेऊन जाहीर करताना सांगितले.

खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांनी केलेल्या विकासकामांचे जोरावर म्हसळा तालुक्यातील जनतेने १२ ग्रामपंचायतीचे सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश प्राप्त करून दिले आहे त्याचे आभार व्यक्त केले. म्हसळा शहराचे पाणी पुरवठा योजना मंजुरीची माहिती देण्यासाठी शासकीय निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार अनिकेत तटकरे यांनी म्हसळा तालुक्यातील ग्रामीण भागात ज्या प्रकारे खा. सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातुन १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन जलजीवन योजना कार्यान्वित करण्यात येत आहेत त्या पार्श्वभूमीवर म्हसळा शहरातील नागरिकांची मागणी असलेली आणि गरजेची असणारी जल शुध्दीकरण योजना केंद्र सरकारच्या अमृत योजने अंतर्गत कार्यान्वित करण्यात येणार आहे. या योजनेची निविदा प्रक्रिया लवकरच पुर्ण करून महिन्याभरात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते भूमीपुजन करण्यात येणार असल्याचे घोषीत केले.

आयोजीत पत्रकार परिषदेत आमदार अनिकेत तटकरे यांच्या समावेत जिल्हा चिटणीस महादेव पाटील, तालुका अध्यक्ष महादेव पाटील, माजी सभापती बबन मनवे, युवक अध्यक्ष फैसल गीते, उपनगराध्यक्ष संजय दिवेकर, माजी सभापती छाया म्हात्रे, महीला अध्यक्षा मिना टिंगरे, शगुप्ता जहांगिर, नगरसेवक सुनील शेडगे, शाहीद उकये, पेवेकर, शेखर खोत, मंगेश म्हशीलकर, नवाब कौसाली, प्रकाश गाणेकर, सलीम चोगले, रियाज फकीह आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार अनिकेत तटकरे यांनी अधिक माहिती देताना सांगितले कि, श्रीवर्धन मतदार संघात रस्ते विकास पुर्णत्वास जात असल्याने आता स्थानिक पातळीवर रोजगाराची संधी निर्माण करण्याचा आमचा प्रामाणिक हेतु आहे. मतदार संघात औद्योगिक विकास करतानाच पायाभूत सुविधा भक्कम करण्यावर आमचा भर असणार आहे. अर्थमंत्री अजितदादांचे माध्यमातुन येथे मोठ मोठे प्रकल्प पुर्ण करण्याचा आमचा मानस असल्याचे बोलुन दाखवले. या वेळी त्यांनी मतदार संघातील छोटे मोठे उद्योग व्यवसायात वाढ होण्यासाठी आणि सर्वांचे हाताला काम मिळण्यासाठी समुद्र जेट्टी विकास, राज्य मार्ग व गावजोड रस्ते विकासासाठी कशा प्रकारे काम सुरू आहे त्याची सविस्तर माहिती दिली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!