घनःश्याम कडू
उरण : ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे जासई ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता येणार हे निश्चित. त्यावर येत्या ६ नोव्हेंबर रोजी शिक्कामोर्तब होईल असा विश्वास शेकापचे तालुका चिटणीस विकास नाईक यांनी व्यक्त केला. थेट सरपंच पदाचे उमेदवार संतोष घरत यांच्यासह सर्व सदस्य पदाच्या जागा महाविकास आघाडीच्या निवडून येण्याची शक्यताही तालुका चिटणीस नाईक यांनी व्यक्त केला.
जेमतेम आठ दिवसांवर मतदान आले असल्याने आता उमेदवारांनीही मैदानात उतरून प्रचाराला सुरुवात केली आहे. यामध्ये संरपचपदासाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांना अवघ्या गावकऱ्यांशी संपर्क साधावयाचा आहे, तर सदस्यपदासाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना आपल्या वॉर्डातील नागरिकांची भेट घ्यावी लागत आहे. यामुळे ते एक-एक व्यक्तीच्या भेटीवर जोर देत आहेत. त्यांच्या प्रचाराला सुरुवात झाल्यामुळे; मात्र गावागावांतील राजकीय वातावरणही तापले आहे.
जासई ग्रामपंचायत बलकाविण्यासाठी विरोधकांनी अनेक डावपेज टाकले आहेत. परंतु येथील मतदार सुज्ञ आहे, तो त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. एकीकडे मोठमोठया पोकळ विकासाच्या डरकाळ्या फोडायच्या हा विरोधकांचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. परंतु गेल्या पाच वर्षात सरपंच असताना संतोष घरत यांनी पक्षीय राजकारण न करता गावाच्या हिताकडे सर्वाधिक लक्ष देऊन विकास करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही जंगजंग पछाडले तरी महाविकास आघाडीचा पराभव करणे त्यांना शक्य होणार नाही. थेट सरपंच पदाचे उमेदवार संतोष घरत हे प्रचंड मताधिक्याने निवडून येऊन सर्व सदस्य निवडून येण्याची शक्यता विकास नाईक यांनी व्यक्त केली.
जासई ग्रामपंचायतवर महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी माजी सभापती नरेश घरत, तालुका चिटणीस विकास नाईक, धर्माशेठ पाटील, मुरलीधर ठाकूर, संतोष घरत, आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत.