• Mon. Jul 28th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पाच वर्षात ढूंकूनही न पाहणाऱ्या उमेदवारांना निवडून देऊ नका -आ. अनिकेत तटकरे

ByEditor

Oct 30, 2023

परिर्वतन पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचार सभेमध्ये केले आवाहन

किरण लाड
नागोठणे :
निवडून गेल्यावर गेल्या पाच वर्षात मतदारांकडे ढूंकूनही न पाहणाऱ्या उमेदवारांना परत संधी देऊ नका असे आवाहन परिर्वतन पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांनी केले.

परिर्वतन पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार मनिषा टके, प्रभाग क्रं. 4 चे सदस्य पदाचे उमेदवार रोहिदास हातनोलकर, कल्याणी घाग व मिनाज कुरेशी यांच्या निवडणूक प्रचारासाठी मीरानगर येथे आयोजित प्रचार सभेमध्ये तटकरे बोलत होते. ते पुढे असेही म्हणाले कि, गेल्या दोन, तीन वर्षामध्ये नागोठणे ग्रामपंचायतीमध्ये विविध विकासकामांसाठी मी असेल, खासदार तटकरे साहेब असतील, नामदार आदितीताई असतील आम्ही जवळपास एक ते दिड कोटीचा शासनाच्या विविध योजनांचा निधी वर्ग केला होता. परंतू, तेथे बसणारी मंडळी स्वतःच्या सावलीला सुद्धा भिणारी आहेत. निधी जर आम्ही आणला तर आपली राजकीय पोळी भाजली जाणार नाही या भीतीपोटी गेल्या कालखंडामध्ये ग्रामपंचायतीकडून एनओसी दिल्या गेल्या नाहीत. यासाठी आपल्या हक्काचा माणूस ग्रामपंचायतीमध्ये बसला पाहिजे. मीरानगर भागावरील असेसमेंटवर लागलेला सरकारी शिक्का निघावा यासाठी शासनदरबारी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

परिर्वतन पॅनलचे नेते विलास चौलकर आपल्या भाषणात म्हणाले कि, या सत्ताधाऱ्यांविरुद्ध लाेकांमध्ये चिड आहे. यांनी गेल्या पाच वर्षात लाेकांना त्रास देण्याचे काम केले आहे. विविध कंपनीकडून नागोठण्याच्या विकासासाठी आलेला सीएसआर फंडामध्ये भष्ट्राचार झाला आहे. मागील निवडून दिलेले सदस्य कामाच्या टक्केवारीमध्ये गुंतले हाेते. असाही आरोप त्यांनी भाषणात केला. मी सरपंच असतांना मीरानगरच्या लाेकांना चाेवीस तास पाणी देण्याचे काम केल आहे. तसेच येथील लाेकांना समाज मंदिर बांधून दिले आहे. मागील सत्तेने पाच वर्षात काहीच काम केलेले नाही.

या प्रचार सभेमध्ये भाजपचे तालुका सरचिटणीस आनंद लाड यांचेही मार्गदर्शनपर भाषण झाले. या प्रचार सभेसाठी सरपंच पदाचे उमेदवारासह, सदस्य पदाचे उमेदवार, राष्ट्रवादीचे विभागीय नेते शिवराम शिंदे, माजी सरपंच विलास चौलकर, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब टके, माजी उपसरपंच सुनील लाड, भाजपचे तालुका सरचिटणीस आनंद लाड, प्रियदर्शनी चालक मालक संस्थेचे अध्यक्ष सिराज पानसरे, शिवसेना शिंदे गटाचे विभागप्रमुख प्रवीण ताडकर, दिनेश घाग, राेहिदास हातनाेलकर, असिफ कुरेशी, परिर्वतन पॅनलचे सर्व कार्यकर्ते, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित हाेत्या.

येत्या 5 नोव्हेंबरला नागोठणे ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. शिवसेना (उबाठा गट), काॅंग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट), शेकाप यांच्या महाआघाडीची जनसेवा आघाडी तर राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना (शिंदे) गट यांच्या परिर्वतन पॅनलशी चुरशीची लढत होणार आहे. दाेन्ही बाजूने निवडणूक प्रचाराला जाेरदार सुरुवात झाली आहे. यावेळी प्रचाराला जास्त दिवस मिळत नसल्याने प्रत्येक उमेदवारांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी घर टू घर प्रचार करण्यावर भर देवून प्रचारामध्ये रंगत भरली आहे. आमदार अनिकेत तटकरे यांनी प्रभाग क्रं. 4 व 6 च्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारासाठी सभा घेवून प्रचारामध्ये खरी रंगत आणली आहे. त्यांच्यासाेबत नागोठणे ग्रामपंचायतीवर सत्ता आणायचीच या उद्देशाने परिर्वतन पॅनेलचे सर्व नेते, कार्यकर्ते निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. जनसेवा आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आता काेणते माेठे नेते निवडणुकीच्या आखाड्यात उतरतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सद्या तरी नागोठणे ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा प्रचार दाेन्ही बाजूकडून शिगेला पाेहचला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!