पर्यटन हंगामात सहा बंदरातील मासेमारी धोक्यात
उपजीविका कशी करणार या चिंतेत मच्छिमार
गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन समुद्रात जेलिफिशचे थैमान सुरू झाले आहे. येथील कोळीबांधवांना मासेमारीत घातक जेलिफिशची वाढ झाल्याने ऐन दिवाळी पर्यटन हंगामात मासळी मिळणे मुश्किल झाले आहे. परिणामी पुन्हा एकदा मच्छीमार संकटात सापडला आहे.
तालुक्यातील समुद्रकिनारी दिघी, आदगाव, दिवेआगर, भरडखोल, जीवना, बागमांडला अशी मासेमारीसाठी प्रसिद्ध बंदर आहेत. कोकणातील पर्यटनासाठी नारळ-सुपारीच्या बागा, निसर्ग सौंदर्याने नटलेली गावे यासोबतच रोजगार मिळवून देणारी पारंपारिक मासेमारी महत्वाची ठरते. मागील दोन वर्षापूर्वी असेच जेलिफिशने समुद्राला घेरले होते. मात्र, यावेळेला मोठ्या प्रमाणात समुद्रात जेलिफिशचे संकट वाढल्याने मासेमारी समस्यांच्या जाळ्यात अडकली आहे.
या गावातील अनेक स्थानिक या समुद्रामध्ये पारंपरिक पद्धतीने किंवा छोट्या-मोठ्या होडीने मच्छीमारी करून उपजीविका करतात. दरम्यान, वातावरणातील बदल, अवेळी वादळी पावसाची हजेरी असे अनेक संकटांतून सामोरे जाऊन मासेमारी दुष्काळ सहन करत असताना त्यामध्ये आता विषारी जेलिफिशने परिसरातील मच्छीमार चिंताग्रस्त झालेत.
जेलिफिशने काय होतं?
थंडी हंगामात समुद्रकिनारी जेलिफिशना पोषक वातावरण तयार होऊन त्या किनाऱ्यालगत मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत होतात. जेलिफिशचा डंक शरीराला इलेक्ट्रिक शॉक लागल्या सारखा असतो. त्यामुळे वेदना होऊन सर्वत्र खाज सुटते. अशी माहिती व्यवसायिक देत आहेत.
मासेमारीला निघताना भीती
खोल समुद्रात गेल्यावर फिसिंगवाले व जाळीवाले आम्हाला मासेमारीचे उत्पादन कमी झाले आहे. मासेमारीत डोलवीमध्ये मोठया प्रमाणात जेलिफिश अडकल्याने ती शरीराला घातक ठरत असून हाता, डोळ्यांना इजा होण्याची भीती मासेमारीला निघताना मनात कायम आहे.
भरडखोल बंदरात गेली काही दिवस मच्छिसाठी टाकलेली जाळी व डोलवी जेलिफिशने भरून निघते. त्यामुळे जाळ्यात मासळी कमी प्रमाणात व जेलिफिश जास्त असते. यामुळे आमचे मोठया प्रमाणात नुकसान होते.
-कल्पेश पावशे,
भरडखोल.
सद्या कोळीबांधवांच्या पदरात फायद्यापेक्षा खोट पडत आहे. मासेमारी नौका किनाऱ्यालाच उभ्या असल्याने नोकरांचे पगार, डिझेल, भत्ता खर्च, जाळीखर्च व कर्जाचे थकलेले हप्ते कसे भरायचे असा प्रश्न पडला आहे. जेलिफिश सारखी नैसर्गिक अपत्तीने अनेकांचे व्यवसाय ठप्प आहेत. त्याकरिता शासन स्तरावर आम्हा कोळी बांधवांना मदत मिळावी.
-लक्ष्मण मेंदाडकर,
चेअरमन, एकविरा मच्छीमार सहकारी संस्था दिघी.