विनायक पाटील
पेण : 20 जुलै 2025 रोजी पहाटे साधारण 2 वाजण्याच्या सुमारास नागोठणे येथून पेझारीकडे जात असलेल्या एका पिकअप टेम्पोला अपघात होऊन ते गांधेपाडा येथील शेतामध्ये पलटी झाले. या अपघातानंतर शेतामध्ये 3 गायी व 2 बैल गुंगीच्या अवस्थेत आढळून आले. गावकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली आणि ही गुरं पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. मात्र, वाहन चालवणारी व गुरं चोरून नेत असलेली टोळी घटनास्थळावरून पसार झाली होती.
गावातील जागरूक तरुण व रिलायन्स गॅस पाइपलाइन सुरक्षेवरील वॉचमन यांच्या माहितीनुसार, या घटनेच्या वेळी पोलिसांची गाडी घटनास्थळी उपस्थित होती. ही माहिती आणि सीसीटीव्ही फुटेज शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांच्यापर्यंत पोहोचल्यावर त्यांनी तत्काळ जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्याशी संपर्क साधून तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी कारवाईला वेग देत संशयित वाहन ताब्यात घेतले आणि गुरं चोरणाऱ्या टोळीतील दोघांना अटक केली.
मात्र या टोळीचा मुख्य सूत्रधार व त्यांना मदत करणारे स्थानिक गुन्हेगार अजूनही फरार असून, त्यांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर प्रसाद भोईर, जिल्हा संघटक नरेश गावंड, जिल्हा संघटिका दीपश्री पोटफोडे, पेण तालुका प्रमुख समीर म्हात्रे, उपजिल्हा संघटिका दर्शना जवके, विधानसभा संघटिका तांडेल, विभागप्रमुख दीपक पाटील, लक्ष्मण खाडे, माजी सरपंच नरेश पाटील, युवती सेनेच्या धन्वंतरी दाभाडे, सुनिता खाडे, मनोज मोकल, संजय भोईर यांच्यासह नागोठणे पोलीस ठाण्याला भेट देऊन कारवाईची माहिती घेतली.
यावेळी प्रसाद भोईर यांनी सांगितले की, “गुरं चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांचा निष्काळजीपणा हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. हिंदू धर्मीयांच्या भावना या प्रकरणांमुळे दुखावल्या जात आहेत. राज्यात हिंदुत्ववादी सरकार असूनही असे प्रकार घडणे ही शरमेची बाब आहे. आम्ही पोलिसांकडून या प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह स्थानिक मदतनीसांची तात्काळ अटक आणि निष्काळजीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करतो. अन्यथा शिवसेना स्वस्थ बसणार नाही.”
दरम्यान, या घटनेनंतर हिंदू जनजागृती समिती व गोरक्षक कार्यकर्ते चेतन कामथे, मंदार चितळे, योगेश ठाकूर, अमोल खाडे आदींनी प्रसाद भोईर यांचे विशेष आभार मानले. त्यांच्या वेळीच लक्ष देण्यामुळे हा गुन्हा दडपला गेला नाही, गुरांचा जीव वाचला आणि काही गुन्हेगारांना अटक झाली.