विनायक पाटील
पेण : शहरातील साई मंदिर, कासार तलाव येथे 20 जुलै 2025 रोजी घडलेल्या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात मंदिरातील एक समई व दोन घंटा चोरीस गेल्याची तक्रार दाखल झाली होती. तपास यंत्रणांनी अतिशय शिताफीने व तांत्रिक पद्धतीने तपास करत अखेर या गुन्ह्यातील आरोपीला अटक केली आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या सूचनेनुसार सुरू करण्यात आला. गुन्हे प्रकटीकरण शाखेने दोन तपास टीम तयार करून तपासाला सुरुवात केली. पेण शहरातील सुमारे 15 ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली. त्यातून एका अनोळखी इसमाचे फुटेज प्राप्त झाले, जो घटनास्थळावरून निघून S.T. बसने पनवेलकडे जाताना दिसून आला.
तपास अधिक खोलवर करत असताना, सदर इसमाने पनवेलहून रेल्वेने मुंबई गाठल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, तपास पथकाने मंदिर चोरीप्रकरणी आधीच्या गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या आरोपींची माहिती घेतली असता, रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महेश नंदकुमार चायनाखवा (रा. थेरोंडा, आगळ्याची वाडी, ता. अलिबाग) हा दि. 21 मे 2025 रोजी अलिबाग कारागृहातून सुटल्याचे समजले. त्याचा फोटो मिळवून सीसीटीव्हीतील व्यक्तीशी तुलना केली असता, साम्य आढळले.
खारपाडा येथे एस.टी. बसमधून आरोपी अटकेत
तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीवर लक्ष ठेवण्यात आले. दि. 25 जुलै रोजी आरोपी पनवेलहून पेणकडे येत असल्याचे लक्षात येताच तपास टीमने खारपाडा चौकी येथे थांबवलेल्या S.T. बसमध्ये आरोपीला शोधून काढले. त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
फक्त पेणमधीलच नव्हे तर या आरोपीने पेण शहरातील अन्य मंदिरांतीलही समई व घंटा चोरी केल्याचे कबूल केले आहे. त्याचबरोबर वडखळ, दादर सागरी, रोहा व कोलाड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मंदिरांमधूनही चोरी केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
सदर आरोपीस अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता दि. 29 जुलै 2025 पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. पुढील तपास सुरु आहे.
ही कारवाई सपोनी निलेश राजपूत, एएसआय राजेश पाटील, हेड कॉन्स्टेबल सुशांत भोईर, प्रकाश कोकरे, अजिंक्य म्हात्रे, सचिन वस्कोटी, पोलीस नाईक अमोल म्हात्रे, पोलीस हवालदार गोविंद तलवारे व संदीप शिंगाडे यांनी केली.
या यशस्वी कामगिरीबद्दल स्थानिक प्रशासनाकडून तपास पथकाचे अभिनंदन करण्यात येत आहे. मंदिर चोरीप्रकरणी ही कारवाई इतर गुन्ह्यांच्या उकलालाही चालना देणारी ठरणार आहे.