पाहणी करणारा कोणी मंत्री उरला आहे का? नागरिकांचा संतप्त सवाल
विश्वास निकम
कोलाड: मागील १५ ते १६ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम आजही अपूर्ण असून सध्या सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. कोलाड ते तळवली-तिसे दरम्यान या खड्ड्यांमुळे गाड्या अडकून बंद पडत आहेत. वाहनचालक आणि प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की मंत्री, खासदार, आमदार आणि बांधकाममंत्री महामार्गाची पाहणी करतात. पाहणी दौऱ्यानंतर काही घोषणा होतात, डेडलाइन दिल्या जातात. पण प्रत्यक्षात काम मात्र तसंच अपूर्ण राहते. त्यामुळे “आता पाहणीसाठी कोणते मंत्री शिल्लक राहिले आहेत का?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
महामार्गाच्या कामासाठी अनेक ठेकेदार नियुक्त करण्यात आले, कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला, पण तरीही रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. कोलाड, आंबेवाडी नाका, नागोठणे, खांब, तळवली, तिसे अशा ठिकाणी महामार्ग अक्षरशः चाळण बनला आहे. तिसे-तळवली दरम्यान तर चार ते पाच फूट खोल खड्डा पडला असून त्यात वाहनं अडकून बंद पडत आहेत.
सध्या खड्डे टाकून रस्ते दुरुस्त केल्याचा केवळ देखावा केला जात आहे. काही ठिकाणी गटारी, लाईन व सर्व्हिस रोडची कामे देखील अर्धवट अवस्थेतच सोडली गेली आहेत. त्यामुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
दरवर्षी याच दरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री, आणि इतर मंत्री या रस्त्याची पाहणी करतात. मात्र रायगड जिल्ह्याला सध्या पालकमंत्री नाही, त्यामुळे ‘या जिल्ह्याचा वाली कोण?’ असा प्रश्न देखील नागरिक विचारत आहेत.
“रस्त्याच्या खड्ड्यांमुळे अपघात होत असताना ठेकेदारांवर कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही. किती ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले? कितींच्या विरुद्ध चौकशी झाली? याचे उत्तर मिळत नाही. ठेकेदारांच्या अडमुठेपणामुळे कामे रखडत आहेत आणि प्रवाशांचा जीव धोक्यात आहे. हे दुर्लक्षित करून चालणार नाही.”
-जयेश घावटे
सामाजिक कार्यकर्ते, कोलाड
प्रवासी आणि वाहनचालकांकडून महामार्गावर तातडीने खड्डे बुजवण्याची, अपूर्ण कामे पूर्ण करण्याची आणि ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे. शासन आणि संबंधित खात्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची वेळ आता निघून गेलेली नाही – पण खूप कमी राहिली आहे.