मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी ‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सुमारे 26.34 लाख महिलांचा लाभ तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या तपासणीत या लाभार्थ्यांपैकी अनेक अपात्र असल्याचे आढळून आले असून, काहींनी एकाहून अधिक शासकीय योजनांचा लाभ घेतल्याचा खुलासा करण्यात आला आहे.
महिला व बालविकास विभागाने सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी विशेष मोहिम राबवली होती. यानंतर प्राप्त झालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा अधिक लाभार्थी असल्याचे, तर काही प्रकरणांमध्ये पुरुषांनी महिलांच्या नावाने अर्ज भरल्याचे उघड झाले आहे. या संदर्भात महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटरवर माहिती दिली.
तटकरे यांनी सांगितले की, या २६ लाखांहून अधिक लाभार्थ्यांची पुनर्तपासणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार असून, पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना पुन्हा लाभ सुरू केला जाईल. दरम्यान, उर्वरित 2.25 कोटी पात्र लाभार्थ्यांना जून 2025 महिन्याचा सन्माननिधी वितरित करण्यात आला आहे.
या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यांनीच या योजनेचा 14 हजारांहून अधिक पुरुषांनी गैरफायदा घेतल्याचा दावा केला होता. त्यांच्या या आरोपानंतर सरकारकडून हालचाल सुरू झाली.
सदर योजनेच्या अंतर्गत पुरुषांनी महिलांच्या नावाने अर्ज भरून जवळपास 21 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे उघड झाले आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर दखल घेत अपात्र लाभार्थ्यांकडून रक्कम वसूल केली जाईल, अशी माहिती दिली आहे. सहकार्य न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या सर्व घडामोडींमुळे ‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थींमध्ये अस्वस्थता पसरली असून, अपात्र लाभार्थ्यांविरोधात सरकार आता कठोर भूमिका घेणार, हे निश्चित झालं आहे.