• Sun. Jul 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आईच्या नात्याला काळीमा! शहापूरमध्ये तीन चिमुकल्यांना विष देऊन हत्या; आई अटकेत

ByEditor

Jul 27, 2025

शहापूर : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात असणाऱ्या अस्नोली गावातून एक संतापजनक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. तीन चिमुकल्या मुलींच्या संगोपनाचा ताण सहन न झाल्याने एका आईनेच आपल्या तिन्ही मुलींना विष देऊन मृत्यूच्या दारात ढकलल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

या दुर्दैवी मुलींची नावे काव्या संदीप भेरे (वय 10), दिव्या संदीप भेरे (वय 8) आणि गार्गी संदीप भेरे (वय 5) अशी आहेत. या तिघींनाही जेवणातून कीटकनाशक औषध देण्यात आले, त्यानंतर प्रकृती खालावल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. काव्या आणि दिव्याचा मुंबईतील नायर रुग्णालयात, तर गार्गीचा घोटी येथील एस.एम.बी.टी. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद झाल्यामुळे संबंधित महिला चेरपोली येथील सासरहून माहेरी अस्नोली येथे आली होती. तिथे ती आर्थिक अडचणी, मानसिक तणाव आणि तीन मुलींच्या जबाबदाऱ्या यामुळे तणावात होती. या नैराश्यातूनच तिने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात संबंधित आईविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिला अटक केली आहे. पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी सुरू केली असून, या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

एकाच वेळी तिन्ही चिमुकल्या बहिणींचा मृत्यू झाल्याने अस्नोली परिसरात शोककळा पसरली आहे. ही घटना आईच्या नात्याला काळीमा फासणारी ठरली आहे. समाजात वाढत्या मानसिक तणाव, आर्थिक संकट आणि पालकत्वाची ओझी यासारख्या प्रश्नांवर पुन्हा एकदा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!