मुंबई : राज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना जोर मिळत असतानाच, महाराष्ट्राच्या राजकारणात लक्षवेधी घडामोड घडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांना थेट पत्र पाठवून त्यांचे विशेष कौतुक केले आहे.
राज ठाकरेंनी संसद भवनात भाजप खासदार निशिकांत दुबे यांना जाब विचारल्याबद्दल वर्षा गायकवाड यांचे अभिनंदन केलं आहे. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून उद्भवलेल्या वादानंतर मराठी अस्मितेच्या संरक्षणासाठी उभारलेल्या परखड आवाजाची राज ठाकरेंनी दखल घेतली आहे.
निशिकांत दुबेंनी मराठी भाषकांबाबत केलेल्या अर्वाच्य विधानानंतर, विरोधी पक्षांच्या महिला खासदारांनी त्यांना संसद भवनात घेरले. वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव आणि प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या खासदारांनी दुबेंना जाब विचारला. “मराठी लोकांना मारण्याची भाषा तुम्ही कशी करू शकता? कुणाला आणि कसे मारणार? ही अर्वाच्य भाषा चालणार नाही,” अशा कठोर शब्दांत गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी “जय महाराष्ट्र” च्या जोरदार घोषणांनी संसद भवनाचा परिसर दणाणून गेला आणि निशिकांत दुबेंना तेथून माघार घ्यावी लागली.
या ठाम भूमिकेबद्दल राज ठाकरेंनी वर्षा गायकवाड यांना पत्र लिहून मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी घेतलेल्या धाडसी भूमिकेचे कौतुक केले. राजकारणातील भिन्न पक्षीय भूमिका असूनही, मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर पक्षभेद विसरून एकत्र येणं आवश्यक असल्याचं यामधून अधोरेखित झालं आहे.
राज ठाकरे यांनी वर्षा गायकवाड यांना पाठवलेले पत्र
खासदार वर्षाताई गायकवाड,
सस्नेह जय महाराष्ट्र!
मराठी माणसांना आपटून आपटून मारू, अशी डोक्ती करणाऱ्या निशिकांत दुबेला तुम्ही संसदेत घेराव घातलात आणि त्याला जाब विचारलात याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा, मराठी भाषेचा अपमान, त्यावर हल्ली सर्रास अन्याय होत असताना, संसदेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे बासदार गप्प असतात असं चित्र मराठी जनांच्या समोर येत होतं, त्याला तुम्ही या कृतीने छेद दिलात. याबद्दल बरंच मनापासून आभार.
महाराष्ट्राला सध्या ‘व्यापक भूमिका घेण्याच्या विचारांनी ग्रासलेलं आहे. माझ्या मते हा उगाच ओढवून घेतलेला न्यूनगंड आहे. महाराष्ट्राने देशाचा विचार केला पाहिजे हे खरं आहे कारण देशाचा विचार करावा आणि देशासाठी काही करावं अशी क्षमता असलेली जी काही मोजकी राज्य आहेत त्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. पण म्हणून आपण मराठी आहोत, मराठी जनतेने आपल्याला निवडून दिलं आहे, त्यामुळे या जनतेप्रती, या प्रांताबद्दल आपली जबाबदारी पहिली आहे याचा विसर पडायला लागला आहे. यामुळेच सव्वाशे वर्ष हिंद प्रांतावर राज्य करणाऱ्या, आणि 1857 चा उठाव असू दे की पुढचा स्वातंत्र्यलढ्याला आकार देणाऱ्यात मरहट्टे होते याचा आपल्याला विसर पडतो आणि म्हणूनच या उत्तरेतील मुजोरांना दिल्लीत सातत्याने महाराष्ट्र आणि मराठी माणसाची ताकद दाखवलीच पाहिजे, आणि तुम्ही ती दाखवलीत याबद्दल मनापासून आभार.
महाराष्ट्रातील इतर ४५ खासदार गप्प का बसले माहित नाही, पण तुम्ही हिंमत दाखवलीत याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. महाराष्ट्रासाठी तुमचा संसदेतील आवाज असाच बुलंद राहील अशी आशा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे. महाराष्ट्र, मराठी भाषा आणि मराठी माणूस या समोर कोणतेही आपले वैचारिक मतभेद अत्यंत क्षुद्र आहेत !
तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !
आपला नम्र,
राज ठाकरे
शिवतीर्थ.
केळुस्कर मार्ग
शिवाजी पार्क, दादर (प)
