प्रतिनिधी
अलिबाग : रायगड जिल्ह्यात शिवसेनेच्या (शिंदे गट) अंतर्गत गटबाजीने आता डोकं वर काढलं आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्याकडून पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख राजा केणी यांना पद्धतशीरपणे डावलले जात असल्याचा आरोप होत आहे. कालच पक्षात दाखल झालेले दिलीप भोईर यांना आमदार दळवींकडून जवळ केले जात असून, या प्रकारामुळे निष्ठावान शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मंगळवारी महावीर ग्रामस्थ मंडळ खंडाळे आयोजित भव्य कुस्ती स्पर्धा २०२५ येथे हा प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार महेंद्र दळवी हे दिलीप भोईर यांना, जे पूर्वी त्यांच्या विधानसभा निवडणुकीतील प्रमुख विरोधक होते, त्यांना जास्त महत्त्व देत आहेत. दिलीप भोईर हे दळवींविरोधात निवडणुकीत उभे असताना दळवींनी त्यांच्यावर प्रचंड टीका केली होती. मात्र, आता त्यांनाच पक्षात घेऊन थेट जिल्हाप्रमुख पदावर असलेल्या राजा केणी यांना चौथ्या किंवा पाचव्या स्थानावर बसवून त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे बोलले जात आहे. तालुकाप्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांपेक्षाही नव्याने आलेल्या भोईर यांना अधिक महत्त्व दिले जात असल्याचे चित्र आहे.
निष्ठावंतांमध्ये नाराजी का?
राजा केणी हे शिवसेनेचे (शिंदे गट) रायगड जिल्हाप्रमुख हे एक महत्त्वाचे आणि मोठे पद भूषवत आहेत. असे असतानाही त्यांना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याने अनेक वर्षांपासून पक्षात काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. पक्षासाठी झटणाऱ्या जुन्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना बाजूला सारून नव्याने आलेल्यांना महत्त्व देण्याच्या या प्रवृत्तीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाच्या कामगिरीवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर असे अंतर्गत वाद उफाळून आल्याने पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खच्ची होण्याची भीती व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. आमदार दळवी आणि जिल्हाप्रमुख केणी यांच्यातील हा वाद वरिष्ठ नेत्यांच्या दरबारी कधी पोहोचतो आणि त्यावर काय तोडगा निघतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
