उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत २ ऑगस्टला होणार प्रवेश
घन:श्याम कडू
उरण : रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि प्रदेश चिटणीस अॅड. प्रविण मधुकर ठाकूर यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त करत पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २ ऑगस्ट २०२५ रोजी अलिबागमध्ये होणाऱ्या विशेष कार्यक्रमात ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृतपणे प्रवेश करणार आहेत.
या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित राहणार आहेत.
स्व. आमदार मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र असलेले अॅड. प्रविण ठाकूर हे रायगड जिल्ह्यातील प्रभावशाली नेत्यांपैकी एक मानले जातात. २००९ साली रायगड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करत निवडणूक लढवून त्यांनी आपली स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण केली होती. तसेच अलिबाग नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी ठोस कामगिरी बजावली आहे.
प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर बोलताना अॅड. ठाकूर म्हणाले, “काँग्रेसमध्ये आता कुठलाही ताळमेळ उरलेला नाही. कार्यकर्त्यांचा आवाज दाबला जातोय. त्याउलट राष्ट्रवादी काँग्रेसकडे कोकण व रायगडसाठी ठोस दिशा आणि धोरण आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे.”
अलीकडेच माणगाव येथील शिवसेनेचे नेते अॅड. राजू साबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता अॅड. प्रविण ठाकूर यांच्या प्रवेशामुळे रायगड जिल्ह्यात काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना मोठा राजकीय धक्का बसणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यातील ताकद आणखी भक्कम होणार आहे.
२ ऑगस्ट रोजी अलिबागमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.