चाणजेकरांचा संताप, ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
घन:श्याम कडू
उरण : उरण-करंजा मार्गासाठी चार कोटी रुपये खर्चून करण्यात आलेले डांबरीकरण अवघ्या दोन महिन्यांतच उखडल्याने चाणजे गावातील ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्याचे डांबरीकरण काही पावसाळी सरीही सहन करू शकले नाही. ठिकठिकाणी खडी उघडी पडली असून, डांबराचा थर गायब झाला आहे. त्यामुळे “रस्ता बांधला की फक्त बुडवला?” असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारू लागले आहेत.
या मार्गाचे काँक्रिटीकरण आणि डांबरीकरण आमदार महेश बालदी यांच्या निधीतून पूर्ण करण्यात आले होते. सुरुवातीपासूनच या कामाच्या गुणवत्तेवर शंका उपस्थित करण्यात येत होती. काम पूर्ण होऊन महिना उलटण्याआधीच रस्ता खराब होऊ लागल्याने ग्रामस्थांमध्ये रोष निर्माण झाला आहे. चाणजेचे सरपंच अजय म्हात्रे यांनी स्पष्ट इशारा दिला की, “हे काम दोन वर्षांच्या देखभालीसह मंजूर झालं आहे, त्यामुळे ठेकेदाराकडून दुरुस्ती करून घेणं भाग आहे.” मात्र, नागरिकांचा यावर ठाम प्रश्न आहे की, “दुरुस्ती करून किती वेळा हा खेळ चालणार?”
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नरेश पवार यांनी नेहमीप्रमाणेच अधिकृत उत्तर देत सांगितले की, “ठेकेदाराकडून दुरुस्ती करून घेतली जाईल.” परंतु स्थानिक नागरिकांचा विभागावर विश्वास उरलेला नाही. खोपटेतील कंटेनर यार्ड असो, पोलीस ठाण्यासमोरील अतिक्रमण असो, की पेन्शनर पार्कमधील टपऱ्यांचे प्रश्न असोत – कुठेच ठोस कारवाई न झाल्याने विभागावर “ठेकेदारांचे नोकर, जनतेचे शत्रू” अशी टीका केली जात आहे.
चाणजे ग्रामस्थांनी या प्रकाराला थेट लुटमार ठरवत ठेकेदार व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे. “चार कोटींचा रस्ता की चार कोटींचा चुराडा?” असा थेट सवाल करत गावकऱ्यांनी प्रशासनाला खडसावले असून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई व्हावी, अशी एकमुखी मागणी आता उरण तालुक्यातून होऊ लागली आहे.