लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या भूमिकेवर संशय
सलीम शेख
माणगाव, दि. २९ : माणगाव शहरात तीन वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या ट्रॉमा केअर सेंटरचे काम अद्याप सुरू न झाल्यामुळे हे केवळ कागदावरील प्रकल्प ठरले आहे. यामुळे रुग्णसेवा, अपघातग्रस्तांवरील तातडीच्या उपचारांची मोठी गरज असतानाही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना उफाळून आली आहे.
ड्रामा केअर सेंटरची उपरोधिक टीका
ट्रॉमा केअर सेंटर मंजूर झाल्याचे जाहीर झाल्यावर संपूर्ण माणगाव तालुक्यात उत्साहाचे वातावरण होते. मात्र तीन वर्षांच्या प्रतिक्षेनंतरही प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. त्यामुळे नागरिक आता याला “ड्रामा केअर सेंटर” म्हणत उपरोधिक टीका करत आहेत.
जागा निश्चित, मात्र अंमलबजावणी ठप्प
सदर केंद्रासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयालगत ३४ गुंठे जागा निश्चित करण्यात आली आहे. सध्या त्या परिसरातील माजी पंचायत समिती इमारतीत तालुका आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय सुरू आहे. हे कार्यालय हलवण्याबाबत रुग्णालय प्रशासनाने पाठपुरावा केला असला तरी अद्याप काही हालचाल झालेली नाही.
मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचा प्रश्न चव्हाट्यावर
मुंबई-गोवा महामार्ग आणि दिघी-पुणे राज्य मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे ट्रॉमा केअर सेंटरची गरज वेळोवेळी अधोरेखित झाली आहे. मात्र रुग्णांवर तातडीने उपचार होण्यासाठी आवश्यक असलेले हे केंद्र अद्याप अस्तित्वातच नाही. यामुळे अपघातग्रस्त रुग्णांना जीव गमवण्याची वेळ येते आहे.
आराखडा मंत्रालयात, पण मंजुरीसाठी प्रतीक्षा
१० खाटांचे ‘लेव्हल-३’ ट्रॉमा केअर सेंटर उभारले जाणार असून, त्यात अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया, अपघात, शवविच्छेदन, डायलेसिस, प्रयोगशाळा व कर्मचाऱ्यांचे निवासस्थान अशा सुविधा प्रस्तावित आहेत. वास्तुविशारदांकडून तयार करण्यात आलेला आराखडा शासनाकडे पाठवण्यात आला असून सध्या तो मंजुरीसाठी मंत्रालयात प्रलंबित आहे. आर्थिक तरतूद मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष काम सुरू होणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, सार्वजनिक आरोग्य विभागाची मंजुरी मिळून २४ फेब्रुवारी २०२५ रोजी चार वर्षे पूर्ण होत असूनही प्रत्यक्ष काम सुरू न होणे ही गंभीर बाब आहे.
प्रशासनाच्या वचनबद्धतेवर प्रश्नचिन्ह
शासन व लोकप्रतिनिधींनी मोठ्या घोषणा करूनही या प्रकल्पाच्या उभारणीत ठोस कृती दिसून येत नाही. त्यामुळे प्रशासनाची वचनबद्धता व कार्यक्षमता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. माणगावसह दक्षिण रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेलगतच्या भागातून रुग्ण उपचारासाठी येथे येतात. त्यामुळे हे ट्रॉमा केअर सेंटर सुरू झाल्यास माणगावच्या आरोग्य यंत्रणेला मोठा आधार मिळणार आहे.
मुहूर्त कधी सापडणार?, नागरिकांचा सवाल
हे ट्रॉमा केअर सेंटर प्रत्यक्षात कधी उभे राहणार? शासन एक पाऊल पुढे कधी टाकणार? असा थेट व प्रांजळ सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. अपघातग्रस्तांचे प्राण वाचवण्यासाठी तातडीच्या सेवांची गरज असूनही याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.