प्रतिनिधी
अलिबाग : “केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे” या उक्तीला साजेशी वाटचाल करत रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा मेढेखार (तालुका अलिबाग) येथील शिक्षक दयानंद दत्तात्रेय अंजर्लेकर यांनी शिक्षणशास्त्र विषयात डॉक्टरेट (Ph.D.) मिळवून एक प्रेरणादायी यश संपादन केले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे मिळालेल्या या डॉक्टरेट पदवीमुळे शिक्षण क्षेत्रात त्यांचे कौतुक होत आहे. “लोकगीतातून प्रतित होणारे शिक्षण व जीवनकौशल्य विषयक विचारांचा अभ्यास” या संशोधन विषयावर त्यांनी प्रबंध सादर केला होता. या अभ्यासप्रबंधासाठी त्यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. किशोर चव्हाण (प्राध्यापक, विठ्ठलराव हांडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, नाशिक) यांचे, तर सहमार्गदर्शक म्हणून डॉ. दिलीप धोंडगे (माजी प्राचार्य, के. टी. एच. एम. कॉलेज, नाशिक) यांचे मार्गदर्शन लाभले.
श्री. अंजर्लेकर यांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये आपला प्रबंध विद्यापीठाकडे सादर केला होता. २५ जून २०२५ रोजी विद्यापीठाने पीएच.डी. पदवी जाहीर केली. त्यांच्या या यशस्वी वाटचालीमुळे शिक्षण क्षेत्रात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, जिल्ह्यातील शिक्षक व पालकवर्गात अभिमानाची भावना व्यक्त केली जात आहे.
ग्रामीण भागात कार्यरत राहून शिक्षणाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणाऱ्या श्री. अंजर्लेकर यांची ही शैक्षणिक झेप इतर शिक्षकांसाठी आदर्श ठरत आहे.