• Tue. Jul 29th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक 10 तासांपासून ठप्प, गॅस टँकर उलटल्याने वाहनांच्या रांगा

ByEditor

Jul 29, 2025

रत्नागिरी : जिल्ह्यातील हातखंबा गावाजवळ आज पहाटे भीषण अपघातात एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर पुलावरून खाली कोसळला. या अपघातानंतर टँकरमधून गॅसची गळती सुरू झाल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून वाणी पेठ परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक गेल्या 10 तासांपासून ठप्प झाली आहे. महामार्गावर दोन्ही बाजूंनी अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, छोट्या वाहनांना बावनदी-पाली मार्गाने वळवण्यात आलं आहे. मात्र, अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग नसल्याने त्यांना रस्त्यावरच थांबावं लागत आहे. महामार्ग सुरळीत होण्यासाठी आणखी चार ते पाच तास लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेनंतर एमआयडीसीच्या आपत्कालीन रेस्क्यू पथकाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून गॅस गळती रोखण्यात यश मिळवलं आहे. पलटी झालेला टँकर सध्या सरळ करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, टँकर सरळ झाल्यानंतर त्यातील उर्वरित गॅस दुसऱ्या टँकरमध्ये सुरक्षितरीत्या स्थलांतरित केला जाणार आहे.

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी घटनास्थळी भेट दिली. बगाटे यांनी सांगितलं की, “जोपर्यंत टँकर बाजूला केला जात नाही आणि मार्ग पूर्णपणे सुरक्षित होत नाही, तोपर्यंत वाहतूक पूर्ववत केली जाणार नाही.” तसेच नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन करत परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!