सलीम शेख
माणगाव : तालुक्यातील कशेणे गावात बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे स्पष्ट झाले असून, हा बिबट्या गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे.
मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या कशेणे गावात दोन दिवसांपूर्वी मनोज गावाणे यांना बिबट्याचे दर्शन झाले होते. मात्र, यावर अनेकांनी विश्वास ठेवला नव्हता. अखेर २९ जुलै रोजी रात्री गणपत सखाराम शिंदे यांच्या घराच्या मागील भागात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याचा वावर स्पष्टपणे दिसून आला.
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बिबट्यामुळे गावातील तीन कुत्री बेपत्ता झाली आहेत. त्यामुळे बिबट्या शिकारीसाठी गावात येत असल्याचा संशय बळावला आहे.
या घटनेची माहिती वनविभागाचे अधिकारी प्रशांत शिंदे यांना देण्यात आली असून, त्यांनी तत्काळ गावात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यांनी ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, समाजप्रबोधनासाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
वनविभागाच्या मार्गदर्शनानुसार गावकऱ्यांना खालील सूचना देण्यात आल्या आहेत:
- रात्रीच्या वेळी एकटे फिरू नये.
- लहान मुलांना एकटे घराबाहेर जाऊ देऊ नये.
- शक्यतो गटानेच बाहेर पडावे.
- कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा.
गावकऱ्यांनी संयमाने आणि धैर्याने परिस्थितीला सामोरे जाण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. पुढील काही दिवस गावात गस्त वाढवण्यात येणार असून, बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.
