राष्ट्रवादीचे 2 नाही तर 3 गट? रोहित पवार यांच्या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
मुंबई : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन नव्हे तर तीन गट असल्याचा धक्कादायक दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. झी २४ तास या वृत्तवाहिनीवरील ‘टू द पॉईंट’ या मुलाखतीदरम्यान त्यांनी हा गौप्यस्फोट केला असून त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.
सध्या शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचा भाग आहे, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी सत्ताधारी आघाडीत सहभागी झाली आहे. मात्र, रोहित पवारांच्या विधानामुळे अजित पवार गटातही अंतर्गत फूट असल्याचे संकेत मिळत आहेत.
“दादांच्या राष्ट्रवादीतही दोन गट आहेत”
रोहित पवार म्हणाले, “अजित पवारांवर काही आरोप झाले तर त्यांच्या पक्षातील किती नेते त्यांच्या पाठीशी उभे राहतील? हे पाहणं गरजेचं आहे.” कोकणातील काही नेते स्वत:ला ‘बॉस’ समजतात, असा टोलाही त्यांनी लगावला. रोहित यांनी नाव न घेता खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका केली. तटकरे यांच्यावर पत्ते फेकल्यावर मारहाण होते, असाही उल्लेख करत त्यांनी गटबाजीवर स्पष्ट भाष्य केलं.
पक्ष व चिन्हांबाबत मोठा दावा
येत्या काही महिन्यात धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरेंना तर घड्याळ हे चिन्ह शरद पवारांना मिळणार असल्याचा मोठा दावा त्यांनी केलाय. तसंच एकनाथ शिंदे आणि अजित पवार त्यांचे पक्ष भाजपात विलीन करणार असल्याचा दावा देखील रोहित पवारांकडून करण्यात आलाय. शिंदेंच्या घरी आयकर विभागाची नोटीस पाठवण्यात आल्याचा आरोप देखील रोहित पवारांकडून करण्यात आला आहे.