• Sat. Apr 19th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगाव पोलीस वसाहतीची अत्यंत दयनीय अवस्था!

ByEditor

Oct 30, 2023

पोलीस कर्मचारी राहतात भाड्याच्या खोलीत

सलीम शेख
माणगाव :
स्वातंत्र्यपूर्व काळापासून उभे असलेल्या माणगाव येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासाची पडझड झाली असून या वसाहतीची स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानंतरही दिवसेंदिवस दयनीय अवस्था सुरु आहे. विकासाचा अजेंडा घेवून राज्यात विविध कामे हाती घेऊन निघालेल्या तीन पक्षीय युती सरकारने माणगाव येथील पोलीस वसाहतीतील कर्मचारी, अधिकाऱ्यांची निवास बांधकाम करण्याकडे गेली अनेक दिवसापासून पाठच फिरवली आहे. सध्या हे कर्मचारी भाड्याच्या खोलीत राहत आहेत.

ब्रिटीश सरकारच्या काळापासून उभे असलेले माणगाव येथील पोलीस ठाणे आणि त्या पोलीस ठाण्याजवळच असणाऱ्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी बांधलेले निवास आजही स्वातंत्र्यानंतर उभे आहे. मात्र, शेकडो वर्षांपूर्वीच्या निवासाची दुर्दशा झाली असून या निवासात कोणीही पोलीस कर्मचारी राहत नसल्याने हे पोलीस निवास भूतबंगलाच बनले आहे. याकडे लोकप्रतिनिधी व शासनाने पूर्णता दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरही माणगाव वसाहतीची उपेक्षा कायमच राहिली आहे. माणगाव पोलीस ठाणे अंतर्गत १४० गावांचा समावेश आहे. यासाठी सुमारे ६८ अधिकारी व कर्मचारी वर्ग काम करीत आहेत.

‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत. नागरिक आणि कायद्यांच्या रक्षणासाठी पोलिसांचे योगदान महत्वाचे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात माणगाव येथे १९१८ – १९ मध्ये दगडी चीऱ्यामध्ये केलेले पोलीस चौकीचे बांधकाम याला १०४ वर्षे पुर्ण होवून गेली. ही पोलीस चौकी आजही तितक्याच दिमाखात उभी आहे. याचा रास्त अभिमान माणगावकरांना आहे. या चौकी जवळच त्यावेळी ब्रिटीश सरकारने कर्मचाऱ्यांसाठी त्या वेळची कर्मचारी संख्या लक्षात घेता निवासस्थान उभारले होते. देशाचा ७५ वा स्वातंत्र्य महोत्सव देशभरात साजरा केला गेला. माणगाव पोलीस वसाहतीत राज्य सरकारने निवासस्थानाच्या वेळोवेळी दुरुस्त्या केल्या. मात्र ही निवासस्थाने दुरुस्त करण्याऐवजी ती पाडून नव्याने बांधणे गरजेचे होते. मात्र याकडे शासनाने अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे स्वातंत्र्यानंतरही माणगाव पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासाची उपेक्षा कायम राहिली आहे.

माणगाव पोलीस ठाण्यात १९६७-६८ मध्ये पोलीस अधिकाऱ्यांसाठी एक निवासस्थान तर २ चाळी मध्ये २६ कर्मचारी राहत होते. सन १९८५-८६ मध्ये तिसरी चाळ बांधण्यात आली. यात १२ निवासस्थाने बांधण्यात आली होती. त्यात १२ पोलीस कर्मचारी राहत होते. या तिन्ही चाळीचे क्षेत्र ७०८१.४० चौरस मीटर असून ही जागा शासनाची आहे. या निवासस्थानाची दुरुस्त्या २०१५ पूर्वी वेळोवेळी करण्यात आल्या. सध्या हे बांधकाम खूप जुने असल्यामुळे त्या काळी बैठे जोते बांधून त्यावर बांधकाम करण्यात आले होते. कालांतराने आजूबाजूच्या परिसरात रस्त्याच्या सुधारणा झाल्यामुळे भराव यामुळे जुन्या इमारतींना पावसाळ्यात भिंतीमध्ये ओलावा निर्माण होवून त्या नादुरुस्त होत गेल्या. गेल्या तीन वर्षांपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने निवासावरील पत्रे उडाले, भिंती पडल्या यामुळे दोन वर्षात या निवासाची प्रचंड नुकसान झाले असून दयनीय अवस्था झाली आहे. या पोलीस वसाहतीचे काम लवकरात लवकर मार्गी लागणे गरजेचे आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!