तीन दिवस साखळी उपोषणाची जय्यत तयारी
मराठा एकवटला ! राणे, कदम यांचा जाहीर निषेध, लोकप्रतिनिधींना ‘नो एन्ट्री’
शशिकांत मोरे
धाटाव : मराठा समाजाच्या आरक्षण मुद्यावर राज्यातील मराठा चांगलाच पेटला आहे. आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा निर्धार मराठ्यांनी केला. दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी प्राणार्थ आमरण उपोषण सुरू ठेवले आहे. आरक्षण मुख्यतः आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सबंध रोहा तालुक्यातील सकल मराठा समाज उद्या मंगळवारपासून तीन दिवसीय साखळी उपोषण करणार आहे. मराठा समाज शासन, प्रशासन यांसह लोकप्रतिनिधींना ताकद दाखवणार असा निर्धार मराठा समाजाने सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ साखळी उपोषणाची जय्यत तयारी सुरू आहे. असंख्य मराठा बांधव, भगिनी साखळी उपोषणात सहभाग घेतील अशी माहिती मराठा समाजाचे अध्यक्ष आप्पा देशमुख यांनी दिली. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मराठा समाजाचा वारंवार अवमान करत आहेत. आंदोलनाची खिल्ली उडवत आहेत असे म्हणत मंत्री राणे व रामदास कदम यांचा आम्ही जाहीर निषेध करतो असा संताप सर्वच मराठा कार्यकर्त्यांनी व्यक्त केला तर साखळी उपोषणात लोकप्रतिनिधींनी येऊ नयेत, त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सरकारी दरबारी मांडावा, आरक्षणाच्या बाजूने रहावे, उगीच देखावा नकोत, सर्वच लोकप्रतिनिधींना नो एन्ट्री आहे असा ईशारा मराठा समाजाने दिल्याने राजीनामा न दिलेले सर्वपक्षीय पदाधिकारी अक्षरशः गप्पगार झाल्याची चर्चा सुरू झाली आता तेच मराठा पदाधिकारी पदांचे राजीनामा देतात का, की समाजाच्या हितापेक्षा स्वतःसाठी पक्षीय पदाला महत्त्व देतात ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राज्यातील मराठा समाज आरक्षण मुद्दा सबंध देशात गाजत आहे.आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटलांच्या प्राणांतिक आमरण उपोषणाने आरक्षण प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. त्यातून मराठा समाजात सरकार, लोकप्रतिनिधी विरोधात संतापाची लाट तयार होत आहे. ठिकठिकाणी उपोषण, मंत्री, आमदार, खासदार यांचा ताफा उडवून जाब विचारणे, जाळपोळ, पुढार्यांना गावबंदी सुरू आहे याच पार्श्वभूमीवर आता रायगडातील मराठा समाज आक्रमक झाल्याचे दिसत आहे. तरीही खोपोलीचे राजकीय नेते सुनिल पाटील यांचा राजीनामा वगळता अन्य कोणत्याही पक्षीय मराठा नेत्याने समाजाच्या हितार्थ राजीनामा दिल्याचे वृत्त नाही, याबाबत समाजात नाराजी आहे. राजीनामा बाबत रोहा तालुक्यातील राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर, ठाकरे गटाचे प्रमुख समीर शेडगे यांनी राजीनाम्याबाबत समिश्र प्रतिक्रिया दिल्या. मराठा आरक्षणाचा मुद्दा, समाजातील नेत्यांबद्दल नाराजी पाहता संबधीत नेतेगण पक्षाच्या पदाचा राजीनामा देतात का ? याच घडामोडीत उद्या मंगळवारी जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रोहा मराठा समाजाने साखळी उपोषणाचे आयोजन केले आहे. साखळी उपोषण व पुढील रणनीतीबाबत माहिती देण्यासाठी सोमवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जेष्ठ नेते व्ही टी देशमुख, अध्यक्ष आप्पा देशमुख, नितीन परब, अमित उकडे, प्रशांत देशमुख, महेश सरदार, सूर्यकांत मोरे, अजित मोरे, संदीप सावंत व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोहा येथील विश्रामगृह सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते व्ही. टी. देशमुख यांनी मराठा आरक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली. शेती करतात ते कुणबी म्हणजेच सर्वजण मराठा कुणबी आहेत. आजही ग्रामीण भागातील शेतकरी त्यांच्या मुलांच्या दाखल्यांवर हिंदू मराठा, कुणबी मराठा असेच आहे. समाज विखुरला आहे. आता आपण सर्व बांधव एक होऊन पुढच्या पिढीला शिक्षणात, नोकरीत भविष्य देऊ या, आरक्षणाच्या लढाईत मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे सांगत देशमुख यांनी राणे, कदम यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. अध्यक्ष आप्पा देशमुख यांनी साखळी उपोषणाची माहिती दिली. तीन दिवसीय साखळी उपोषणात विभागावर मराठा समाज बांधव सहभाग घेतील तसेच निवेदन सर्वच प्रशासनाला देण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता रोहा नगरपालिकेसमोरील प्रांगणात साखळी उपोषणाला प्रारंभ होणार आहे. आता मराठा समाज ताकद दाखवून देणार आहे. मराठा समाज एकवटला आहे, असे देशमुख यांनी ठणकावून सांगितले. आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांना उपोषण स्थळी एन्ट्री नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे, रामदास कदम यांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत, असा संताप मराठ्यांनी व्यक्त केला. दरम्यान, मराठा आरक्षण मुद्दा व जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषण समर्थनार्थ सकल मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला, आता मराठा समाज पुढे अधिक काय भूमिका घेतो? याची चर्चा सुरू झाली आहे.
राज्यातील मराठा समाजाला आरक्षणाची गरज असून ते मिळायलाच हवे अशी माझी व माझ्या समाजाची धारणा आहे. पण शासनाकडून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यास दिरंगाई होत आहे.शासनाच्या निषेधार्थ व नकारात्मक भूमिके विरोधात रोहा तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) युवा सेनेचे पदाधिकारी राजेश काफरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा पपक्षश्रेष्ठींकडे दिला आहे.