• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ब्ल्यू जेट हेल्थकेअर कंपनी स्फोटामध्ये ११ जण दगावल्याची शक्यता; सात गंभीर जखमी

ByEditor

Nov 3, 2023

पंधरा दिवसातील महाड एमआयडीसीतील दुसरी घटना
कामगारांची औद्योगिक सुरक्षा वाऱ्यावर!, महाडमध्ये एनडीआरएफला पाचरण

मिलिंद माने
महाड :
महाड एमआयडीसी मधील अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात असलेल्या ब्लू जेट हेल्थकेअर या कंपनीत आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये कंपनीमध्ये काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी सात जण गंभीर जखमी आहेत तर 11 जण दगावल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे. महाड एमआयडीसीमधील अग्निशामक यंत्रणेच्या हाताबाहेरील प्रकरण असल्यामुळे राज्य शासनाने एनडीआरएफला पाचारण केले आहे. या गंभीर घटनेमुळे महाड एमआयडीसीतील कंपन्यांमधील कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध होत असून पंधरा दिवसातील महाड एमआयडीसीतील ही दुसरी घटना असल्याने महाड औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्लू जेट कंपनीमधील सकाळच्या सुमारास झालेल्या घटनेमध्ये सात कामगार जखमी असून ११ कामगार मृत झाल्याची प्राथमिक धक्कादायक माहिती हाती आल्याने महाड एमआयडीसीमधील आजूबाजूच्या गावात या कंपनीच्या विरोधात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. या कंपनीच्या बाहेर मृत कामगारांच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली असून महाड शहर, महाड औद्योगिक वसाहत, पोलादपूर व आजूबाजूच्या ठिकाणावरून महाड औद्योगिक वसाहतीमध्ये पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे.

महाड औद्योगिक वसाहती मधील 4/1 प्लॉट नंबरमध्ये ब्लू जेट हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आग लागून भीषण स्फोट झाला. या स्फोटानंतर कंपनीच्या प्लांटमध्ये असलेल्या एका रिएक्टरचा स्फोट झाला. यामुळे येथील आग पसरली गेली आणि रिएक्टर्सचे एका मागून एक असे स्फोट होत गेले. या स्फोटांच्या दणक्याने कामगार जिकडे वाट मिळेल तिकडे पळू लागले. शेजारी असलेल्या विरल, झुआरी, आणि ऍक्वाफार्म या कंपनीतील कामगारांनी देखील सुरक्षेच्या कारणामुळे कंपनी बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला.

महाड एमआयडीसीच्या अतिरिक्त एमआयडीसी मधील ब्लू जेट मधील ज्या प्लांटला आग लागली तो कंपनीचा प्लांट पूर्णपणे स्फोटात जमीनदोस्त झाला. एवढेच नव्हे तर या कंपनीमध्ये इमारतीत असणारे लोखंडाचे खांब देखील वितळून जमीनदोस्त झाल्याची घटना घडली आहे. कंपनीचे पूर्ण स्ट्रक्चर जमीनदोस्त झाल्याने त्या ढिगार्‍याखाली हे अकरा कामगार अडकून मृत पावले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महाड औद्योगिक वसाहतीमधील असणाऱ्या अग्निशामक दलाच्या बंबांनी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतु, कंपनीचे स्ट्रक्चर जमीनदोस्त झाल्याने व त्याखाली अडकलेल्या ११ कामगारांना काढणे महाड औद्योगिक वसाहतीमधील अग्निशामक दलाला शक्य होत नसल्याने अखेर राज्य सरकारकडे एनडीआरएफला पाचारण करण्यास सुचविण्यात आले आहे.

महाड एमआयडीसीमधील ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीत प्राथमिक माहितीनुसार १८ कामगार काम करत होते. आग लागताच अनेकजणांनी आपला जीव वाचवण्यासाठी कंपनी बाहेर पळ काढला.

ब्लू जेट कंपनीमधील जखमी कामगारांची नावे पुढीलप्रमाणे;
१) स्वप्निल भामरे
२) विक्रम ढेरे
३) निमाची मुरमु
४) मयूर निंबाळकर
५) राहुल गिरमे
६) स्वप्निल भामरे
७) उत्तम विश्वास
८) ज्योतु पूरब

ब्लू जेट कंपनीमधील बेपत्ता असणाऱ्या परंतु, मृत असल्याचे प्राथमिक माहितीनुसार बेपत्ता असलेल्या कामगारांची नावे पुढील प्रमाणे;
जीवन कुमार चोबे, अभिमन्यू उंराव, विकास महातो, अक्षय सुतार, सोमीनाथ विधाते, विशाल कोळी, संजय पवार, असलम शेख, सतीश साळुंखे, आदित्य मोरे हे अकरा कामगार गायब असून मृत झाले असल्याची धक्कादायक माहिती कंपनी बाहेर जमलेल्या कामगारांच्या नातेवाईकांमध्ये चर्चिली जात होती.

महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्लू जेट कंपनीमध्ये आज झालेल्या या गंभीर स्फोटांमुळे औद्योगिक वसाहतीमधील सर्वच कंपन्यांमधल्या कामगारांची औद्योगिक सुरक्षा ऐरणीवर आली असून याबाबत औद्योगिक महामंडळाचे कामगार सुरक्षा मंडळ याला पूर्णपणे जबाबदार असल्याचे सांगण्यात येत आहे. महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्लू जेट कंपनीमध्ये झालेल्या गंभीर घटनेमुळे गायब झालेल्या कामगारांचे मृतदेह कंपनीतील रिऍक्टरच्या स्फोटामुळे पूर्णपणे वितळून गेले असल्याची शक्यता असल्याने ओळख पटवणे देखील प्रशासनाला अवघड होणार आहे.

महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्लू जेट कंपनीत झालेल्या आजच्या घटनेमुळे पुढील गंभीर परिस्थिती टाळण्यासाठी एनडीआरएफला पाचारण करण्यात आले असून एनडीआरएफ येण्यास रात्रीचे दहा वाजणार असून त्यानंतर कंपनीतील गायब असणाऱ्या कामगारांचा शोध घेण्याचा निर्णय होणार आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!