रोह्यात आमरण उपोषणाची सांगता
शशिकांत मोरे
धाटाव : मराठा आरक्षण मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रोह्यात सुरु करण्यात आलेल्या साखळी उपोषणाची सांगता आज शुक्रवारी सकाळी झाली. तीन दिवस अन्नत्याग करणारे मराठा योद्धा राजेश काफरे आणि महेश शिंदे यांना नारळ पाणी पाजून त्यांच्या आमरण उपोषणाची सांगता करण्यात आली. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील ज्या ज्या वेळी आमरण उपोषणाला बसतील त्यावेळी पुन्हा आपण अन्नत्याग करून उपोषण करू, आरक्षण आणि समाजाच्या हितासाठी आपला प्राण गेला तरी बेहत्तर असे मराठा समाजाचे योद्धा राजेश काफरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
उपोषणाच्या चौथ्या दिवशी सकाळी आपले उपोषण स्थगित केल्यानंतर मराठा योद्धा राजेश काफरे यांनी समाजाला संबोधित केले. आज मराठा आरक्षणासाठी मराठा समाजबांधव एकवटले आहेत हे दृष्य बघून खऱ्या अर्थाने समाधान वाटत आहे. समाजात एकोपा टिकून ठेवण्यासाठी अशाच पद्धतीने संघटीत होऊन संघर्ष करू या, एकीच्या माध्यमातून आपण समाजाला न्याय मिळवून देऊ शकतो. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे आपले आदर्श आहेत. शासनाने दिलेल्या मुदतीनंतर मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही तर मनोज जरांगे पाटील ज्या ज्या वेळी आमरण उपोषणाला बसतील मी देखील या अनुषंगाने पुन्हा एकदा त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून अन्नत्याग करून उपोषणाला बसणार. आरक्षण आणि समाज हितासाठी आपला प्राण गेला तरी बेहत्तर असे सांगत मराठा समाजाचे योद्धा राजेश काफरे यांनी मनोज जरांगे पाटील यांना आपला पाठिंबा दर्शविला.

उपोषण समारोपाच्या सुरुवातीला मराठा आरक्षणाकरिता काही ठिकाणी ज्या समाजबांधवांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आरक्षणासाठी मराठा आता पेटून उठला आहे. विविध ठिकाणी मोर्चे, आंदोलने व उपोषण होत असल्याने शासनाच्या मनात धडकी भरली आहे. सरकारच्या विनंतीला मान देऊन मनोज जरांगे पाटील यांनी मुदत दिली आहे. मुदतीत आरक्षणाचा मुद्दा निकाली नाही निघाला तर आपण आपला लढा अशाच पद्धतीने सुरु ठेऊ असा इशारा सकल मराठा समाजाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी दिला.
ज्येष्ठ नेते व्ही. टी. देशमुख यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी एक चळवळ उभी केली आहे. दोन महिन्यात सरकारने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आम्ही आत्महत्या करणार नाही तर मारून मरू असा थेट इशारा देत बांधवांना आत्महत्या न करण्याचा सल्ला दिला. यावेळी मराठा योद्धा राजेश काफरे, महेश शिंदे, नितीन परब, महेश सरदार, विजय मोरे, विनोद पाशिलकर, समीर शेडगे, पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, राजेंद्र जाधव, रोहिदास पाशिलकर,अमित उकडे, सूर्यकांत मोरे, अमोल देशमुख, प्रशांत देशमुख, संदीप सावंत, सुहास येरुणकर, परशुराम चव्हाण, किशोर तावडे, शशिकांत मोरे, निलेश शिर्के, अजित मोरे, चंद्रकांत पार्टे, अंनत देशमुख, वैभव शेलार, किरण मोरे, विनोद सावंत आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रोह्यातील कोकण शेतकरी व मजूर सामाजिक संस्था, रोहा-अष्टमी मुस्लीम समाज रोहा, दि अखिल भारतीय विश्वकर्मा महासभा, सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान, वंचित बहुजन आघाडी, श्री राजस्थान ओसवाल वेतांबर मूर्तिपूजक संघ, जैन युवक संघटना रोहा, स्पंदन नात्म कला क्रिडा शैक्षणिक मंडळ, रोहा ऑटो रिक्षा चालक मालक संघटना, रोहा विद्यार्थी वाहतूक संघटना या समाज आणि स्वयंसेवी संस्थांनी साखळी उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शविला होता. तर रोहा पोलिस स्टेशन, रोहा तहसिलदार, प्रांताधिकारी रोहा, आरोग्य विभाग- रोहा, सफाई कामगार, रोहा मंडप ध्वनी व्यवस्था, (हॉटेल सुरूची) देसाई यांनीही सहकार्याची भूमिका दाखविली.
दरम्यान, योगेश्वरी भजनी मंडळ पिंगळसई, भजनी मंडळ गावठान, विशाल चोरणे, नांदगाव गायक व विविध कलाकार यांनी याठिकाणी आपली भजनी कला सादर केली. रात्री दरम्यान, कोलाड विभागातून गणेश शिंदे, अजय लोटनकर, राहुल शिंदे, किरण देशमुख, सागर भेकणकर, विजय शिंदे, रमेश देशमुख, रोशनी देशमुख, वृषभ, वाभूती तेजस देशमुख, हिंदवी सावंत, किमया देशमुख यांनीही याठिकाणी उपोषणकर्त्यांना साथ दिली. तीन दिवस सुरू असलेल्या या साखळी उपोषणात सर्वांनी विशेष सहकार्य करून शांततेत आंदोलन यशस्वी केल्याबद्दल समाज बांधव, महिला भगिनी, तरुणवर्ग, ज्येष्ठ मंडळीचे शशिकांत मोरे यांनी आभार मानले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
