मिलिंद माने
महाड : महाड अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रामधील ब्ल्यू जेट हेल्थकेअर या कंपनीमध्ये शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कंपनीमध्ये झालेल्या स्फोटामध्ये अकरा कामगार बेपत्ता झाले होते. यापैकी सात जणांचे मृतदेह एनडीआरएफच्या हाती लागले आहेत. दरम्यान, कंपनीच्या गेट बाहेर कामगारांच्या नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली असून कंपनी मालकावर कारवाई करण्याची जोरदार मागणी कामगारांच्या नातेवाईकांनी प्रशासनाकडे केली आहे.
महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्लू जेट हेल्थकेअर या कंपनीमध्ये तीन नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता स्फोट होऊन सात कामगार जखमी झाले तर अकरा कामगार दगावल्याची भीती व्यक्त केली जात होती. संपूर्ण कंपनीचे स्ट्रक्चर आगीमध्ये जळून गेल्याने आज सकाळपासून जळालेल्या अवस्थेमध्ये सात कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीमधील मृत पावलेल्या या कामगारांची ओळख पटवणे देखील कठीण होणार असल्याने 11 पैकी सात कामगारांचे मृतदेह ताब्यात मिळाले आहेत. त्यांचे डीएनए तपासणीसाठी महाड ग्रामीण रुग्णालयात आणून पुढील उपाययोजनेकरिता वैद्यकीय पथक सज्ज झाले आहे. दरम्यान, ४० तास ओलांडून गेले तरीही प्रशासनाकडून या अपघातास जबाबदार असणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने अनेक कामगारांच्या नातेवाईकांनी कंपनीच्या गेट समोर संताप व्यक्त केला. मालकाला पकडून समोर आणा व त्याच्यावर कारवाई करा अशा प्रकारचा आक्रोश कामगारांचे नातेवाईक या ठिकाणी व्यक्त करत होते. एका बाजूला आपल्या घरातील व्यक्ती दगावल्याचे दुःख असताना दुसरीकडे मात्र हा संताप त्यांच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसून येत होता. या अपघातामध्ये महाड तालुक्यातील तळीये येथील शिंदे, खरवली व पडवी या ठिकाणचे स्थानिक कामगार देखील मृत झाले आहेत. याशिवाय काही परराज्यातील व परप्रांतीय कामगारांचा देखील समावेश आहे. बाहेर काढण्यात आलेल्या मृतदेहांचे सांगाडे डीएनए तपासणीसाठी पुढे पाठवण्यात येणार आहेत.
महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीमध्ये काल झालेल्या स्फोटामुळे ज्या अकरा कामगारांपैकी सात कामगारांचे मृतदेह मिळाले असले तरी चार कामगारांचे मृतदेह अद्याप मिळालेले नाहीत. त्यामध्ये असलम शेख कराड येथील राहणारा होता. त्याचे नातेवाईक कंपनीच्या गेटजवळ येऊन त्याच्या मृतदेहाची मागणी करत होते. मात्र, त्याचा मृतदेह सापडत नसल्याने त्याच्या नातेवाईकांसह प्रशासन त्यांच्या मागणी पुढे हतबल झाले आहे. ज्या सात कामगारांचे मृतदेह सापडले त्यांच्या नातेवाईकांचे ओळखीसाठी व डीएनए टेस्टसाठी नातेवाईकांच्या रक्ताचे नमुने घेण्यासाठी महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी काळे यांनी या नातेवाईकांना कंपनीच्या गेटमधून आत मध्ये नेले व व कामगारांच्या नातेवाईकांच्या रक्ताचे नमुने घेण्याचे काम कंपनी आवारात वैद्यकीय पथकामार्फत चालू केले आहे.
