मिलिंद माने
महाड : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर जायचे म्हणून दुपारच्या सत्र ऐवजी सकाळच्या सत्रात जाऊन किल्ले रायगडावर जाण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या महाड तालुक्यातील चोचिंदे गावातील आदित्य मोरे याचे स्वप्न अखेर अधुरेच राहिले.
महाड तालुक्यातील चोचिंदे गावातील आदित्य मोरे हा 22 वर्षीय तरुण ब्लू जेट हेल्थ केअर कंपनीत काही महिन्यापूर्वीच कामाला लागला होता. ३ नोव्हेंबर रोजी आदित्यचे कामावर जाण्याचे दुपारच्या सत्रात नियोजित होते मात्र, किल्ले रायगडावर जाण्यासाठी त्याने दुपारच्या सत्रा ऐवजी सकाळच्या सत्रात कामावर जाण्याचा निर्णय घेतला. महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीत कामावर जाण्यासाठी सकाळीच निघालेला आदित्य मोरे याचा शुक्रवार, ३ नोव्हेंबरचा दिवस अखेरचा ठरला. घरात एकुलता एक असणाऱ्या आदित्यच्या अचानक जाण्याने मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आदित्य मोरे याच्या जाण्याने त्याचे वडील हतबल झाले आहेत. त्यांच्या तोंडून एकही शब्द निघत नव्हता. हे असे अघटीत होईल असे त्यांना देखील वाटले नव्हते.
