• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

प्रकृती खालावल्याने राजेश काफरे यांना रुग्णालयात केले दाखल; अन्नत्याग करीत ४ दिवस केले होते उपोषण

ByEditor

Nov 4, 2023

शशिकांत मोरे
धाटाव :
रोह्यात आरक्षण मागणीसाठी चार दिवस अन्नत्याग करीत आमरण उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते राजेश काफरे यांची शनिवारी प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मराठा समाजाकडून रोह्यात करण्यात आलेल्या साखळी उपोषणादरम्यान राजेश काफरे यांनी ४ दिवस अन्नत्याग करीत आमरण उपोषण केले होते. गुरुवारी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी त्यांचे उपोषण थांबविल्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी राजेश काफरे यांनी आपले आमरण उपोषण थांबविले होते. उपोषणा दरम्यानही प्रकृती खालावल्याने काफरे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

डॉक्टरांनी त्यांना उपोषणस्थळीच सलाईन लावण्याचा सल्लाही दिलेला, मात्र राजेश काफरे यांनी सलाईन लावण्यास त्यावेळी नकार दिला होता. उपोषण सोडते वेळी ते थोडे अस्थिर होते. मनोगत व्यक्त करताना त्यांचे शब्द फुटत नव्हते, परंतु शुक्रवारी विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळी त्यांची प्रकृती स्थिर होती, आज शनिवारी सकाळी त्यांना अधिक अस्वस्थ वाटू लागले, कणकणही जाणवल्याने कुटुंबिय आणि मित्रांनी त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले असून त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. सकल मराठा समाजाचे अध्यक्ष आप्पा तथा प्रदीप देशमुख, रोहा सिटीझन फोरमचे अध्यक्ष नितिन परब, रोह्याचे माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, महेश सरदार, संदीप सरफळे, प्रशांत देशमुख, अमोल देशमुख, परशूराम चव्हाण आदींनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!