आमदार खासदारांनी निवडणुका केल्या प्रतिष्ठेच्या; अनेक ठिकाणी काटे की टक्कर!
शरद जाधव
रोहा : तालुक्यामध्ये उद्या दि. ५ नोव्हेंबर रोजी १२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून स्थानिक गावचे राजकारणात सुद्धा खासदार, आमदार यांनी सहभाग घेतल्याने आपल्या अस्तित्वासाठी आमदार खासदारांनी निवडणूका प्रतिष्ठेच्या केल्याचे निवडणुक प्रचारावरून दिसून आले.
महाराष्ट्राच्या राजकारणातले बदलते राजकीय स्थित्यंतरे यामुळे स्थानिक मतदार, कार्यकर्त्यांनी सुद्धा अनेक ग्रामपंचायतीमध्ये नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसून आले. गावागावात एकमेकाशी पंगा घेणे टाळले. काही ठिकाणी शिंदे गट-राष्ट्रवादी युती, शेकाप-शिंदे गट युती, तर काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढत आहेत, तरी सुद्धा रोहा म्हटले की राजकारण असणारच आणि त्यातच रोह्याला आम. महेंद्र दळवी, आम. रवीशेठ पाटील, माजी आम. धैर्यशील पाटील खा. सुनील तटकरे, आ. अनिकेत तटकरे, मंत्री आदिती तटकरे, आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील यांचा विधानसभा मतदारसंघाचा भाग येत असल्याने प्रत्येकाने आपल्या राजकीय वर्चस्वासाठी निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत.
रोह्यात खांबेरे, चणेरा, न्हावे, कोकबन, सानेगाव, आरे, विरझोली, तांबडी बुद्रुक, खारगाव, नागोठणे, भातसई अशा बहुचर्चित व महत्त्वाच्या अशा १२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये थेट सरपंच पदाकरिता व सदस्य पदाकरिता असंख्य उमेदवार नशीब आजमावत असल्याचे दिसून येत आहे. महेंद्र दळवी यांनी रोहा तालुक्यात सातत्याने लक्ष घातले असून विकासकामाचा झंजावात सुरू केल्याने शिंदे गटाकडे विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे. त्यामुळे ताकद देणारा आमदार कार्यकर्त्यांना मिळाल्याने व मनोजकुमार शिंदे यांची खंबीर साथ असल्याने कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले असून शिंदे गट या ग्रामपंचायतीत अनेक ठिकाणी खाते खोलणार असल्याचे शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे. ग्रामपंचायतीमध्ये आम. महेंद्र दळवी, आम. अनिकेत तटकरे, शेकाप आम. जयंत पाटील, माजी आ. पंडित पाटील यांनी प्रचारात सहभाग घेतला असल्याचे दिसून आले. त्यामुळे कोण बाजी मारणार, शिंदे गट, राष्ट्रवादी की शेकाप याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सदर १२ ग्रामपंचायतमध्ये चणेरा, नागोठणे, भातसई, कोकबन, खारगाव, विरजोली अशा अनेक ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे नेते आहेत व स्वतः निवडणूक रिंगणात आहेत. कोकबनमध्ये पुन्हा एकदा हरिश्चंद्र वाजंत्री विरुद्ध उद्देश वाडकर असा सामना रंगला आहे तर भाजपाकडून नीलम अतुल पाटील यांनी उमेदवारी घेतली आहे. गेले अनेक वर्षे शेकापकडे असणारी भातसई ग्रामपंचायत शिवसेना शिंदे गटाकडे खेचून आणण्याचा आ. महेंद्र दळवी यांचा प्रयत्न आहे तर या ठिकाणी राष्ट्रवादीचा सरपंच निवडून आणण्याकरता अनिकेत तटकरे लक्ष घालीत आहेत. सानेगाव ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादी विरोधात शेकाप व शिंदे गट यांनी स्थानिक गाव पातळीवरील युती करून राष्ट्रवादीची सत्ता उलथवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामूळे या ठिकाणी शेकापचे नंदूशेठ म्हात्रे ग्रामपंचायत ताब्यात घेऊन राष्ट्रवादीला शह देतील का हे दिसून येइल. तर विरजोली ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादीकडून जगन्नाथ कुंडे यांना डावलण्यात आले असल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी भरलेली आहे. नेत्यांना आता राजकारण भविष्यात टिकण्याकरता शर्यतीतले घोडे लागतात थकलेले नको हेच विरजोलीमध्ये दिसून आले. एकंदरीत काहीच महिन्यावर आमदारकी, खासदारकीच्या निवडणुका सुद्धा येऊन ठेपले असल्याने आपले स्थानिक अस्तित्व टिकवण्यासाठी आमदार, खासदार, ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये जातीने लक्ष घालत असल्याचे दिसून येत आहे तर पूर्वीपेक्षा स्थानिक राजकारणात खूप मोठी डोकेदुखी वाढली असल्याचे सुद्धा नेत्यांना या निवडणुकीनिमित्त पाहायला मिळाले.
