दादर गावातील संदेश पाटील यांचा मृत्यू तर आणखी तिघांनाही लागला शॉक
विनायक पाटील
पेण : तालुक्यातील दादर गावातील ४५ वर्षीय तरूण संदेश गोरख पाटील हा आपल्या भावंडासह सकाळी साडे नऊच्या सुमारास रावे खोकरी या ठिकाणी चिंबोरी पकडण्यासाठी जात असताना गवतात पडलेल्या विद्युत प्रवाहित तारेला धक्का लागून जागीस गतप्राण झाला. यामध्ये विद्युत महामंडळ पूर्णतः दोषी असून विद्युत महावितरण कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे एका होतकरू तरुणाचा मृत्यु झाला आहे. या घटनेनंतर दादर ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना असून संदेशच्या नातेवाईकांना महावितरण कंपनीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
दादर गावामध्ये अनेक तरुण उदनिर्वाहासाठी मासेमारी करण्यास दादर-रावे खाडीमध्ये जात असतात. रोजच्या प्रमाणे संदेश सह इतर तीन तरुण भालचंद्र पाटील, संतोष पाटील, पद्माकर घरत खेकडे पकडण्यासाठी दादर गावाला लागून असलेल्या रावे खोकरी याठिकाणी गेले असता संदेश गवतात पडला, त्याला काय झाले हे मागे असणाऱ्या तिघांना समजले नाही. त्यातील एकजण पुढे सरसावला, परंतु त्याच्या पायात गम बुट असल्या कारणाने तो वाचला. त्यावेळी त्याला किरकोळ विजेचा धक्का लागून तो ही पडला. हा सर्व काय प्रकार होतोय हे पाहण्यासाठी इतरही दोघे धावत आले. जिवंत विजेची तार गवतात पडली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ओरडून एकामेकांना सांगितल्यामुळे इतर तिघांचा जीव वाचू शकला.
संदेश याच्या उजव्या पायाला जिवंत विजेची तार लागून जखम झाली असून विजेच्या जोरदार धक्क्यामुळे त्याचा जागीच मृत्यु झाला आहे. याविषयी दादर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला असून अधिक तपास दादर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अजित गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी तलाठ्यांना तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. सदरील घटना माजी आमदार पंडीतशेठ पाटील यांना समजताच त्यांनी निवासी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून मृत्याच्या नातेवाईकांना योग्य ती भरपाई मिळावी अशा सुचना दिल्या आहेत.
मी, माझा भाऊ आणि इतर दोघ आम्ही चिंबोरी पकडण्यासाठी जात होतो. माझा भाऊ संदेश हा आमच्या पेक्षा दहा एक फुट अंतराने पुढे चालत होता. आम्ही मागे होतो. अचानक त्याला गवतात कोलमडून पडताना पाहून आम्ही घाबरलो. काय सुरू आहे हे आम्हाला काहीच समजले नाही. आम्ही त्या दिशेने निघालो होतो. परंतु, आमच्या पायात असलेल्या गम बुटांमुळे आम्हाला किरकोळ शॉक लागला म्हणून आम्ही वाचलो. जिवंत विद्युत तार गवतात पडणे ही विद्युत महावितरणची अक्षम्य चुक आहे. आज विद्युत महावितरणच्या बेजाबदारपणामुळे आमचा भाऊ आम्हाला सोडून गेलाय तरी त्याच्या कुटुंबाच्या व मुलांच्या पुढील भवितव्यासाठी महावितरण कंपनी व शासनाने योग्य ती भरपाई द्यायलाच हवी असे भालचंद्र पाटील यांनी बोलताना सांगितले.
