अनंत नारंगीकर
उरण : तालुक्यातील चिरनेर, दिघोडे व जासई या तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सोमवारी (दि. ६) निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मतमोजणी दिवशी महाविकास आघाडीचे विजयाचे वादळ घोंगावल्याचे चित्र पहावयास मिळाले. चिरनेर ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत शिवसेना महाविकास आघाडीचे भास्कर मोकल हे विजयी झाले आहेत. दिघोडे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीचे किर्तीनिधी ठाकूर हे विजयी झाले आहेत. तर महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या जासई ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत शेकाप महाआघाडीचे संतोष घरत हे विजयी झाले आहेत. यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

चिरनेर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत शिवसेना महाविकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार भास्कर मोकल यांना ३१२८ मताधिक्य मिळाल्याने ते विजयी झाले आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे उमेदवार प्रतिक संजय गोंधळी यांना १२२४ मताधिक्य मिळाल्याने ते पराभूताचा सामना करावा लागला आहे. तर चिरनेर ग्रामपंचायतीच्या १५ सदस्य पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना महाविकास आघाडीचे १४ उमेदवार विजयी झाले असून भाजपने एक मतांनी सदस्य पदासाठी समिर डुंगीकरच्या रुपाने खाते खोलले आहे.

दिघोडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार किर्तीनिधी ठाकूर यांना १२३७ मताधिक्य मिळाल्याने ते विजयी झाले आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे उमेदवार महेंद्र उर्फ मयुर घरत यांना ७९२ मताधिक्य मिळाल्याने त्यांना पराभूताचा सामना करावा लागला आहे. तर दिघोडे ग्रामपंचायतीच्या ९ सदस्य पदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीचे ९ उमेदवार विजयी झाले असल्याने भाजपाला सत्तेपासून दूर जावे लागले आहे.
जासई ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत शेकाप महाविकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार संतोष घरत यांना १९२५ मताधिक्य मिळाल्याने ते विजयी झाले आहेत.तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे उमेदवार बळीशेठ घरत यांना १८७३ मताधिक्य मिळाल्याने त्यांना अटी तटीच्या रंणसग्रामांत पराभूताचा सामना करावा लागला आहे. तर जासई ग्रामपंचायतीच्या १७ सदस्य पदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीचे १२ उमेदवार विजयी झाले असून भाजपचे ५ उमेदवार विजयी झाले आहेत. निवडणुक निर्णय अधिकारी तसेच उरणचे तहसीलदार डॉ. उध्दव कदम, उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले तसेच तीन ही ग्रामपंचायत हद्दीत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
