वैभव कळस
म्हसळा : ३९ ग्रामपंचायती आणि १ नगरपंचायत असलेल्या म्हसळा तालुक्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीपुर्वी १२ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूका ५ नोव्हेंबर रोजी पार पडल्या. यामध्ये ९ ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्य पदासाठीची निवडणूक बिनवरोध झाली आहे. निवडणूक झालेल्या ३ ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाचा गजर झाला आहे. खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या विकासकामांना म्हसळावासियांनी प्राधान्य दिले आहे. बिनविरोध झालेल्या ९ पैकी ८ ग्राम पंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व तर एक ग्रामपंचायत शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे आहे.
वारळ, वरवठणे, कोळवट ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या चुरशीच्या लढतीत वरवठणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच पदाचे उमेदवार जयदास भायदे यांचा अवघ्या ६ मतांनी विजय झाला आहे. भायदे यांना ४५९ तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नारायण नाक्ती यांना ४५३ मते मिळुन निसटता पराभव पत्करावा लागला. याच ग्रामपंचायतमध्ये प्रभाग क्रमांक २ मध्ये दोन सदस्य पदासाठी झालेल्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सरपंच रियाज फकिह यांचा अवघ्या ४ मतांनी विजय झाला. रियाज फकिह यांना १४९ तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रसचे अमानुल्ला शिरशिकर यांना १४५ मते मिळुन निसटता पराभव पत्करावा लागला. याच प्रभागात सर्वसाधारण स्त्री सदस्य पदाकरिता झालेल्या निवडणूकीत काँग्रसच्या तालिब आफरीन या ९ मतांनी विजयी झाल्या त्यांना १७३ मत मिळाली त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फिरदोस टोळकर यांना १६४ मत मिळाली. प्रभाग क्रमांक ३ मध्ये तीन जागांसाठी झालेल्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत नाक्ती १७ मतांनी विजयी झाले. त्यांना २०९ मत मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे गोविंद भायदे यांना १९२ मते मिळाली. महीला आरक्षित जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लक्ष्मी गाणेकर यांचा ४७ मतांनी विजय झाला त्यांना २२३ मते मिळाली त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेना ठाकरे गटाच्या उज्वला नाक्ती यांना १७६ मत मिळाली. सर्वसाधारण स्त्री जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जयश्री नाक्ती यांचा १७ मतांनी विजय झाला असून त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या राजेश्री नाक्ती यांना १९० मत मिळाली.
शिवसेना उद्धव ठाकरे गट वारल ग्रामपंचायतीचा गड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काबीज केला आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस सरपंच पदाच्या उमेदवार कविता महेंद्र पेरवी यांनी ११० मतांची आघाडी घेऊन दणदणीत विजय मिळवला आहे. पेरवी यांना ४३१ तर शिवसेनेच्या रेश्मा रमेश खोत यांना ३२१ मत मिळाली. येथे तीन प्रभागात ७ सदस्य पदासाठी झालेल्या निवडणूकीत सर्वच्या सर्व जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक १ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जगन्नाथ पाटील १३९ मत, वारलकर समिक सुधीर यांना १६२ मत, अस्मिता सुनिल सावंत १४२ मत मिळवुन मोठ्या फरकाने निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक २ मध्ये काझी अल्तमश हबीब २२२ मत, गुजार नवाज काझी १७६ मत, प्रभाग क्रमांक ३ मध्ये चाळके किरण २१३ मत, पाटील मिना चंद्रकांत २०९ मत घेऊन मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. वारळ ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचा बालेकिल्ला काबीज केला असून एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
कोळवट ग्राम पंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच पदाचे उमेदवार सुवर्णा सुनिल येळवे यांनी मतांचे बेरजेत आघाडी घेतली आहे. प्रभाग क्रमांक २ मध्ये मतदान झालेल्या ५७ मतांची आकडेवारी तांत्रिक बिघाडमुळे समजुन येत नसल्याने सरपंच उमेदवाराचा विजयाचा निकाल घोषीत केलेला नाही मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुवर्णा येलवे यांना मिळालेली मतांची आकडेवारी हि शिवसेनेच्या स्मिता प्रकाश मोहिते यांना मिळालेल्या आकडेवारी पेक्षा जास्त आहे. याच ग्रामपंचायतमध्ये प्रभाव १ मध्ये दोन जागेसाठी झालेल्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया घडशी यांना १०० मत तर प्रविणा ठोंबरे यांना ७५ मत मिळुन त्यांनी शिवसेनेच्या प्रतिभा बेटकर यांचा पराभव केला आहे. त्यांना अवघी ४८ मत मिळाली. पांगलोली ग्रामपंचायतमध्ये दोन जागेसाठी झालेल्या निवडणूकीत दोनही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत. येथे अ. जबार कौचाली यांना ११५ मत तर महीला राखीव जागेसाठी माजिदा कौचाली यांना १२४ मत मिळवत विजय मिळवला आहे. भेकऱ्याचा कोंड ग्रामपंचायतमध्ये प्रभाग क्रमांक १ मध्ये एका जागेसाठी झालेल्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सोनु कावणकर यांना १०७ मत तर त्यांचे प्रतिस्पर्धी रविंद्र जाधव यांना अवघी दोन मत मिळाली आहेत.
म्हसळा तालुक्यात १२ ग्रामपंचायतीपैकी नेवरूळ, घूम, ठाकरोली, जांभुळ, आडी महाड खाडी, कुडगाव या सहा ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविरोध झाल्या असून पांगलोली ग्रामपंचायतमध्ये सरपंच आणि ७ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. निवडणूक झालेल्या सर्वच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला आहे. विजयी उमेदवारांचे खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांनी अभिनंदन केले आहे. निवडणूक यशस्वी पार पाडण्यासाठी म्हसळा तहसीलदार समीर घारे, नायब तहसिलदार गणेश तेलंगे, संबंधीत निवडणूक अधिकारी यांनी काम पाहिले तर पोलिस निरीक्षक संदीपान सोनावणे, अन्य पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.
