आ. महेंद्र दळवी यांच्या हस्ते उद्घाटन
प्रतिनिधी
अलिबाग : अलिबाग समुद्र किनार्यावर आयोजित ‘अलिबाग बीच शो’चे रविवारी (5 नोव्हेंबर) शानदार उद्घाटन पार पडले. आ. महेंद्र दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या संगीतमय सोहळ्याची सुरुवात झाली. स्थानिक कलाकारांनी नृत्य, गायनाने उपस्थितांची मने जिंकली. तर प्रसिद्ध आगरी हास्यकलाकार जॉनी रावत यांनी या सोहळ्याची रंगत वाढवली.
अलिबागमध्ये दर शनिवार-रविवारी लाखो पर्यटक येत असतात. आलेल्या पर्यटकांना जास्तीत जास्त आनंद मिळवून देण्याकरिता ‘आरटी’ फाऊंडेशन तर्फे दर शनिवार, रविवारी सायंकाळी अलिबाग समुद्रकिनार्यावर ही सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. या उपक्रमाची सुरुवात रविवारी ‘मराठी रंगभूमी दिनी’ दिमाखदार सोहळ्याने झाली.
आ.महेंद्र दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला. यावेळी आरसीएफ कंपनीचे जनरल मॅनेजर संजीव हरळीकर, आरसीएफ कंपनीचे जनसंपर्क अधिकारी संतोष वझे, कामगार नेते दिपक रानवडे, काँग्रेसचे नेते हर्षल पाटील, अर्जुन पाटील, ज्येष्ठ वकील अॅड.विलास नाईक, शेकाप नेते दत्ता ढवळे, कार्यक्रमाचे आयोजक राजन वेलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली.
स्थानिक गायक, नृत्यकलाकारांनी आपल्या कलेचे उत्कृष्ट सादरीकरण करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. तर प्रसिद्ध आगरी हास्यकलाकार जॉनी रावत यांनी उपस्थितांमध्ये हास्याची लहर उठवली. सूत्रसंचालक प्रतिम सुतार आणि योगेश पवार यांनी कार्यक्रम रंगतदार केला. अलिबाग समुद्रकिनार्यावर रंगलेल्या या सोहळ्याला प्रेक्षकांनी प्रतिसाद देत, भरभरुन दाद दिली. या उपक्रमाद्वारे स्थानिक संस्कृती जपताना स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव दिला जाणार आहे. तसेच देशाच्या कानाकोपर्यातून येणार्या पर्यटकांना त्यांची कला सादर करण्याकरिता खुला मंच उपलब्ध करुन दिला जाणार आहे.
