राष्ट्रवादीकडे ८, माविआ व शिंदे गट प्रत्येकी ५, शिंदे गट-शेकाप १, मांजरवणे वि. आ १, भाजप १
सलीम शेख
माणगाव : तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी रविवार दि. ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यावर सोमवार दि. ६ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजल्यापासून मध्यवर्ती प्रशासकीय भवन तहसील कार्यालय माणगाव येथील सभागृहात तालुक्याचे तहसीलदार विकास गारुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रक्रिया शांततेत व उत्साहात पार पडली. मतदान झालेल्या या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत माणगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) पक्षाने सर्वाधिक ८ ग्रामपंचायतींवर विजय मिळविला तर तालुक्यातील महाड विधानसभा मतदार संघातील निजामपूर विभागात राष्ट्रवादी काँग्रेस- उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महाविकास आघाडीने एकत्रित येत ५ ग्रामपंचायतींवर, शिवसेना शिंदे गटाने ५ ग्रामपंचायतींवर, शिंदे गट- शेकाप आघाडीने १ ग्रामपंचातीवर, मांजरवणे विकास आघाडीने १ ग्रामपंचायतीवर तर तालुक्यात भाजपने महाड विधानसभा मतदार संघातील गोरेगाव विभागातील एक ग्रामपंचातीवर विजय मिळविला. तालुक्यातील या ग्रामपंचायतींचा निकाल ऐकण्यासाठी तहसील कार्यालय बाहेर विविध पक्षाच्या नेते मंडळी, कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी गर्दी केली होती. यावेळी माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी केंद्र ठिकाणी व केंद्राबाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

माणगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका दि. ५ नोव्हेंबर रोजी जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी तालुक्यातील दहिवली तर्फे गोवेले, काकल, चांदोरे, विहूले, कविळवहाळ बु. या ५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका गाव पातळीवर सरपंच पदासह पूर्ण बिनविरोध झाल्या. या बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये दहिवली तर्फे गोवेले ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मुमताज युसूफ बंदरकर, काकल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ऋतिका रामदास गायकवाड, विहूले ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अस्मिता अनंत केंबळे, कविळवहाळ बु. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्राची प्रमोद खेतम तर चांदोरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी साक्षी सुजित शिंदे हे बिनविरोध निवडून आले आहेत. तर निवडणूक झालेल्या गोवेले ग्रामपंचायत सरपंचपदी राकेश यशवंत पांचाळ ( ५०५ मते -शिंदे गट), उणेगाव सरपंचपदी शुभांगी राजेंद्र शिर्के (९६७ मते – राष्ट्रवादी काँग्रेस), नागाव सरपंचपदी यशवंत चंद्रू कासरेकर (५१८ मते- भाजप), वारक सरपंचपदी वैष्णव वसंत साठे (७९७ मते- राष्ट्रवादी काँग्रेस) वडगाव सरपंचपदी सुषमा राजेश पानवकर (८२४मते- शिंदे गट), शिरसाड सरपंचपदी प्रमोद पांडुरंग खेतम (९८६ मते- शिंदे गट), पळसगाव बु. सोनाली नितीन आंब्रे (६७९ मते- राष्ट्रवादी), कडापे सरपंचपदी अस्मिता जनार्दन शिळीमकर (६७४ मते- राष्ट्रवादी) गंगावली सरपंचपदी वैशाली विष्णू जाधव (५४५ मते- राष्ट्रवादी) अंबर्ले सरपंचपदी अंकुश नारायण उभारले (२६२ मते-शिंदे गट), वडवली सरपंचपदी मजहर उस्मान डावरे (९३१ मते- शिंदे गट), पुरार सरपंचपदी राहिला अब्दुल गफूर हुरजूक (३३६मते- राष्ट्रवादी), वणीमलईकोंड सरपंचपदी अलमास जाबीर पाल (२९७ मते- राष्ट्रवादी), भाले सरपंचपदी दत्ताराम सीताराम खांबे (१३२२ मते- माविआ), रातवड सरपंचपदी वैशाली गंगाराम जाधव( ३३४ मते- राष्ट्रवादी) भुवन सरपंचपदी दिपक श्रीराम जाधव ( ८११ मते- राष्ट्रवादी) मोर्बा सरपंचपदी शौकत युनूस रोहेकर (१७३४ मते- राष्ट्रवादी), जिते सरपंचपदी विमल राम होगाडे (८५७ मते- माविआ), खरवली सरपंचपदी संतोष रघुनाथ खडतर (८२० मते- शिंदे-शेकाप आघाडी), मांजरवणे सरपंचपदी आस्मा अब्दुल जलील फिरफिरे ( ६२२ मते- मांजरवणे विकास आघाडी) लोणशी सरपंचपदी सिद्देश शांताराम पालकर ( ११५४ मते- राष्ट्रवादी) हे निवडून आले आहेत.

तालुक्यातील प्रतिष्ठित श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या मोर्बा ग्रामपंचातीत खा. सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व मोर्बा गावचे सुपुत्र तरुणांचे स्फूर्तीस्थान रायगड जिल्हा शांतता कमिटीचे सदस्य अल्ताफदादा धनसे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शेतकरी कामगार पक्षावर दणदणीत विजय संपादन करून ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवला. भुवन ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना शिंदे गटाचा पराभव करीत सरपंचपदी राष्ट्रवादीचे प्रदेश युवक सचिव दिपक जाधव हे भरघोस मतांनी निवडून येऊन ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवला. खरवली ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेले नवनिर्वाचित सरपंच संतोष खडतर यांना राष्ट्रवादीने सरपंच पदाची उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून संतोष खडतर हे खरवली ग्रामपंचायत सरपंचपदी शिंदे गट- शेकाप आघाडीकडून दणदणीत मतांनी निवडून येऊन ग्रामपंचायत ताब्यात घेतली. तालुक्यातील महाड विधानसभा मतदार संघातील निजामपूर विभागातील निवडणूक लागलेल्या ६ ग्रामपंचातींपैकी शिंदे गटाच्या ताब्यात असणाऱ्या कडापे, गंगावली, पळसगाव बु. या तीन ग्रामपंचायतींवर तसेच जिता व भाले या पाच ग्रामपंचायतींवर खा. सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व विभागातील नेते तथा महाड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या महाविकास आघाडीने घवघवीत यश संपादन केले. विभागातील शिरसाड या एकमेव ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच पदाचे उमेदवार किरण पागार यांचा निसटता पराभव झाला परंतु या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ सदस्य निवडून आले आहेत. वरच्या पातळीवर महायुती, महाविकास आघाडी असल्या तरी स्थानिक पातळी वरील कार्यकर्त्यांची मने जुळली नसल्याने माणगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने चित्र- विचित्र आघाड्या मतदारांना पाहायला मिळाल्या. या प्रकारच्या चित्र- विचित्र आघाड्यांची जोरदार चर्चा या निवडणुकीदरम्यान माणगाव तालुक्यात नाक्या- नाक्यांवर ऐकावयास मिळत होती.

| सकाळी १० वाजलेपासून माणगाव प्रशासकीय भवन येथे मतमोजणीला सुरुवात झाली. सकाळ पासूनच सर्वच पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मतमोजणी सभागृहाबाहेरील पटांगणात मोठी गर्दी केली होती. माणगाव पोलिसांना चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. ग्रामपंचायत निकालाचे स्पीकरवरून माहिती दिली जात होती. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात विजयी उमेदवाराच्या घोषणा देवून दाद दिली. दुपारी १२.३० वाजेपर्यंत सर्व २१ ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर करण्यात आले. विविध पक्षाच्या विजयी उमेदवाराच्या मिरवणूक ढोल – ताशा, गुलाल व फटकाच्या आतिषबाजीसह काढण्यात आली. माणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे धक्कादायक निकाल हाती आल्याने सर्वच पक्षाचे कार्यकर्ते, नेत्यात एकच चर्चा सुरु होती. |
