• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाडमध्ये गोगावले यांचे वर्चस्व कायम!

ByEditor

Nov 6, 2023

१२ पैकी ३ ग्रामपंचायती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे

मिलिंद माने
महाड :
रविवारी (५ नोव्हें.) घेण्यात आलेल्या तेरा ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. या १२ ग्रामपंचायतींपैकी दहा ग्रामपंचायतीवर गोगावले यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. उर्वरित तीन ग्रामपंचायती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडे गेल्या आहेत.

महाड तालुक्यातील बावळे ग्रामपंचायतमध्ये केवळ सदस्य पदासाठी निवडणूक घेण्यात आली होती. महाडमध्ये २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यातील ८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने तालुक्यात शेल, चांढवे बु., किंजलोली खुर्द, कोतुर्डे, तळोशी, नांदगांव बु., नेराव, टोळ बु., तेलंगे, तेलंगे मोहल्ला, रावढळ आणि बावले अशा १३ ग्रामपंचायतीमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. सोमवारी सकाळी घेण्यात आलेल्या मतदानाचा निकाल जाहीर करण्यात आला. महाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये सकाळी दहा वाजता या मतमोजणी प्रक्रियेस सुरुवात झाली. सहा टेबलवर मतमोजणी करण्यात आली. याकरिता जवळपास ६० कर्मचारी आणि ८० पोलीस बंदोबस्त करता तैनात होते.

महाड तालुक्यात तेरा ग्रामपंचायतींपैकी दहा ग्रामपंचायतीवर आमदार गोगावले यांनी आपल्या शिंदे गटाच्या शिवसेनेचे वर्चस्व कायम ठेवले आहे. येथील रावढळ ग्रामपंचायतीवर नामदेव हरिश्चंद्र रेशीम, किंजलोळी खु. ग्रामपंचायतीवर कोमल गौरव भालेकर, कोथुर्डे – अंकुश लक्ष्मण पवार, काचले – योगिता रुपेश केमडेकर, नेराव – बाबुराव सिताराम सुतार, तेलंगे मोहल्ला – सुवर्णा महादेव धोंडगे, तेलंगे – सायली राकेश मनवे अशी सरपंच पदी विजयी उमेदवारांची नावे आहेत. यातील प्रतिष्ठेची असलेली टोळ बुद्रुक ग्रामपंचायत ही शिंदे गटाच्या हातातून गेली आहे. या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने विजय प्राप्त केला आहे. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांनी महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकच जल्लोष केला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!