• Fri. Jan 30th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

परवाने देण्यापूर्वीच महाडमध्ये उभे राहिले फटाका स्टॉल!

ByEditor

Nov 7, 2023

पोलादपूरमधील घटनेची पुनरावृत्ती प्रशासनाला महाडमध्ये करायची आहे का? नागरिकांचा सवाल

मिलिंद माने
महाड :
महाडमध्ये मागील पाच वर्षापासून फटाके विक्रीची दुकाने खुल्या मैदानात मांडली जावीत असे कागदोपत्री नमूद असले तरी प्रत्यक्षात हि दुकाने भर वस्तीत, रस्त्याकडेला, पालिकेच्या नाल्यावर सुरु केली जात आहेत. याबाबत नागरिकांकडून केल्या जाणाऱ्या तक्रारींना केराची टोपली दाखवली जात असून पोलादपूरमध्ये मागील आठ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती महाडमध्ये घडवायची आहे का? असा सवाल नागरिक प्रशासनाला विचारीत आहेत.

महाड शहरात मुख्य बाजारपेठेतील भर वस्तीमध्ये व वाहतुकीच्या वर्दळीच्या रस्त्यावर शहरात फटाके विक्रीसाठी दुकान उघडताना अनेक नियम आणि अटी आहेत. फटाक्यांपासून अनेक ठिकाणी आग लागण्याचे प्रकार देखील महाराष्ट्रात घडले आहेत. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात मागील आठ वर्षांपूर्वी फटाक्याच्या दुकानाला आग लागून संपूर्ण बाजारपेठ जळून खाक झाली होती व लाखो रुपयांचे दुकानदारांचे नुकसान झाले होते. ते नुकसान आज देखील भरून आलेले नाही. असे असताना व याची पूर्ण कल्पना प्रशासनाला असताना देखील शहरातील मुख्य रस्त्यांवर विनापरवाना फटाके विक्रीची दुकाने राजरोसपणे लावली आहेत.

फटाक्याची दुकाने रस्त्याच्या कडेला अथवा मोकळ्या मैदानात लावताना देखील फटाक्यांच्या दुकानासाठी नियमावली आहे. मात्र या नियमावलीला महाड शहर परिसरात हरताळ फासल्याचे मागील पाच वर्षापासून दिसत असून त्याची पुनरावृत्ती चालू वर्षी देखील फटाके दुकानदारांनी केली आहे. महाड शहरातील फटाके दुकानदारांसाठी परवाना घेणे आवश्यक असताना मागील चार वर्षात केवळ परवान्यासाठी अर्ज केल्याची कागदपत्रे दिसत असून कोणालाही मागील चार वर्षात परवाना देण्याचे काम महसूल शाखा, पोलीस स्टेशन अथवा नगरपालिका प्रशासनाकडून झालेले नाही. असे असताना देखील चालू वर्षी त्याचीच पुनरावृत्ती या वर्षी देखील झाली आहे. परवाना देण्याअगोदरच फटाके दुकानदारांनी आपली दुकाने भर रस्त्यात व सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी लावली आहेत.

फटाके दुकानदारांसाठी असणाऱ्या नियमावलीचे फक्त कागदोपत्री कडक नियमांचे पालन कागदावरच केले जात आहे. गर्दीच्या ठिकाणी फटाके विक्री केली जावू नये असा नियम असला तरी या नियमाला पायदळी तुडवून परवाने मिळण्या आधीच सर्रास फटाके विक्री सुरु झाली आहे. महाड शहरात महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि महाड नगरपालिका यांच्या संयुक्त तपासणीतून परवाने दिले जातात. कार्यालयात बसून हे परवाने दिले जात असल्याने प्रत्यक्षात फटाके विक्रेते बेजबाबदारपणे फटाके विक्री करताना दिसून येतात. महाड शहरात महाड नगरपालिकेने यावर्षी छ. शिवाजी महाराज चौक येथील राजमाता जिजाऊ गार्डन समोरील मोकळी जागा दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात महाडच्या मुख्य रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते एसटी स्थानकाकडे जाणारा मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज चौक, छ. शिवाजी महाराज चौक ते भगवानदास बेकरी, मुख्य बाजारपेठ, अशा ठिकाणी फटाके विक्रीची दुकाने सुरु करण्यास सुरुवात झाली आहे.

महाड शहरात अनेक वर्ष फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याबाबत शासन विचाराधीन आहे. मात्र, अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही. मात्र महाड नगर पालिकेकडे काही फटाके विक्रेत्यांनी अर्ज दाखल केले आहेत. याबाबत अद्याप कोणताच ना हरकत दाखला दिलेला नसतानाच महाड शहराच्या छ. शिवाजी महाराज मार्गावर रस्त्यालगत फटाके विक्री स्टॉल उभारण्यास सुरवात झाली आहे. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेरीवाले आणि औद्योगिक क्षेत्रातील बसेस, रिक्षा उभ्या असतात. यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडी होतेच शिवाय सुरक्षेच्या दृष्टीने ही ठिकाणं धोकादायक आहेत.

शहरात फटाके विक्री करणाऱ्या दुकानदारांकडे फटाके दुकानाजवळ आग लागल्यानंतर ती विझवण्यासाठी फायर सिस्टीम असणे गरजेचे आहे. मात्र, महाड शहरातील ज्या ज्या ठिकाणी फटाके विक्रेत्यांचे दुकाने आहेत त्या त्या ठिकाणी कोणतीही फायर सिस्टीम नसल्याने तसेच ही दुकाने भरवस्तीत वर्दळीच्या ठिकाणी असल्याने उद्या आकस्मिक आग लागल्यानंतर जर अनुचित प्रकार घडला तर याची जबाबदारी नगरपालिका, पोलीस यंत्रणा की महसूल यंत्रणेची आहे याबाबत कोणीही सुस्पष्टपणे सांगण्यास तयार नसल्याने फटाके विक्री करणाऱ्या दुकानदारांचे फावले आहे. मात्र, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या फटाके विक्रेत्यांनी कोणतीही सुरक्षेच्या दृष्टीने अंमलबजावणी केली नसल्याने महाड शहरात पोलादपूरच्या घटनेची पुनरावृत्ती प्रशासनाला करायची आहे का? असा सवाल महाडमधील नागरिक प्रशासनाला विचारीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!