घन:श्याम कडू
उरण : लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पावनभूमीत म्हणजे जासई ग्रामपंचायतमधील निवडणुकीत महाविकास आघाडीने एकहाती सत्ता मिळविली. तसेच तालुक्यातील चिरनेर व दिघोडे या ग्रामपंचायतमध्येही महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. यामुळे यापुढील कोणत्याही निवडणुका या महाविकास आघाडीचा माध्यमातून लढविल्या तर नक्कीच खासदार व आमदार ही निवडून येऊ शकतात असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी जासई ग्रामपंचायत सरपंच संतोष घरत व उपसरपंच माही पाटील यांच्या पदग्रहण सोहळ्या प्रसंगी केले.

तालुक्यातील थेट सरपंच निवडून आले आहेत. त्याचबरोबर उपसरपंच पदाचीही निवडणूक घेण्यात आली. उपसरपंच पदासाठी माही पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाली. त्यानंतर पदग्रहण सोहळा संपन्न झाला त्यावेळी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. जासई ग्रामपंचायतमध्ये थेट सरपंच म्हणून संतोष घरत, चिरनेरमध्ये भास्कर मोकल, दिघोडेमध्ये किर्तीनाथ ठाकूर हे निवडून आले होते. तर उपसरपंच पदासाठी जासईमधून माही पाटील, चिरनेरमध्ये सचिन घबाडी तर दिघोडे मधून अभिजित ठाकूर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्यासह प्रदेश सदस्य डॉ. मनीष पाटील, मच्छीमार सेलचे प्रदेशाध्यक्ष मार्तंड नाखवा, माजी सभापती नरेश घरत, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, अकलाक शिलोत्री, तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, शेकापचे सुरेश पाटील आदींनी अभिनंदन केले. यावेळी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी जासई ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच संतोष घरत व उपसरपंच माही पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित सत्कार समारंभात मार्गदर्शन करताना जर महाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीसह खासदार आमदार ही महाविकास आघाडीचा निवडून येऊ शकतात असे प्रतिपादन घरत यांनी केले. तसेच ज्याप्रमाणे पूर्वी एकत्रितपणे कंपनीत धडक देऊन नोकरभरती करीत होतो, तोच फॉर्म्युला वापरला तर नक्कीच नोकरभरती करणे शक्य होईल. यासाठी आतापसूनच मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात करू या असे सांगितले.
यावेळी थेट सरपंच म्हणून निवडून आलेले जासई सरपंच संतोष ठाकूर यांनी राज्यातील एक नंबरची ग्रामपंचायत बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. ग्रामपंचायतचा विकास हाच एकमेव ध्यास असल्याचे दिघोडे ग्रामपंचायत सरपंच किर्तीनाथ ठाकूर यांनी सांगितले. तर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे चिरनेर सरपंच भास्कर मोकल यांनी सांगितले. या सोहळ्यासाठी धर्माशेठ पाटील, तात्या, रवी घरत, माणिक म्हात्रे, रमाकांत म्हात्रे, बाबुराव पाटील, मुरलीधर ठाकूर, संजय ठाकूर, यशवंत घरत, रघुनाथ म्हात्रे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी यापुढील सर्व निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याचा निर्धार करण्यात आला.
