• उपमुख्यमंत्री अजित पवारांसह मंत्र्यांची कर्जतला हजेरी
• सभेच्या निमित्ताने सुधाकर घारे यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन
गणेश पवार
कर्जत : कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघ हा सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेचा बनला आहे. अशात आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून २९ नोव्हेंबर रोजी कर्जतमध्ये निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री व पक्षाचे नेते पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती पक्षाचे कर्जत येथील नेते सुधाकर घारे यांनी पत्रकारपरिषदेतून दिली आहे. दरम्यान, या सभेच्या निमित्ताने सुधाकर घारे हे विधानसभा मतदारसंघात जंगी शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे पक्षस्तरीय विचार मंथन शिबिर कर्जतमध्ये होत आहे. या पार्श्वभूमीवर कर्जतमध्ये पक्षाची निर्धारसभा होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस कर्जत खालापूर पक्ष कार्यालयाचे लोकार्पण देखील होणार असल्याची माहिती पक्षाचे स्थानिक नेते सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दिनांक १८ नोव्हेंबर रोजी कर्जत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत येथील नेते व माजी राजीप उपाध्यक्ष सुधाकर घारे हे बोलत होते.
कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाची निर्धार सभा ही २९ नोव्हेंबर रोजी शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या पोलिस मैदान येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, कृषी मंत्री धनंजय मुंढे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, मावळ मतदारसंघ आमदार सुनील शेळके, विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे आदी नेते यासह पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. तर या सभेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार हे कर्जतमध्ये येणार आहेत. त्यासह नव्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झालेले रायगड भाग्यविधाते खासदार सुनील तटकरे हे देखील कर्जतमध्ये दाखल होत पदाधिकारी कार्यकर्ते यांना संबोधित करणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह शिगेला पोहचला आहे. दरम्यान याचवेळी कर्जत येथे नव्याने उभे राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे. तर उपमुख्यमंत्री आमचे नेते अजित पवार यांच्यासह येणारे मान्यवर यांचे स्वागत देखील न भूतो न भविष्यती असेच असेल अशी माहिती देखील घारे यांनी दिली आहे.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत येथील नेते व माजी राजीप उपाध्यक्ष सुधाकर घारे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य भरत भगत, हनुमंत पिंगळे, प्रदेश सरचिटणीस अशोक भोपतराव, कर्जत तालुकाध्यक्ष भगवान चंचे, खालापूर तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
