सत्तर वर्ष नोंदी कोणी लपवल्या त्यांची नावे जाहीर करा – मनोज जरांगे पाटील
- किल्ले रायगडावर छ.शिवाजी महाराजांना अभिवादन
- दुपारी एकच्या सभेला साडे तीन वाजले
मिलिंद माने
महाड : मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचे आज महाडमध्ये स्वागत करण्यात आले. पोलादपूरमध्ये जंगी स्वागत झाल्यानंतर ते छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर गेले. किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन महाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आरक्षणावर उपस्थित मराठा बांधवांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य करताना सत्तर वर्ष नोंदी कोणी लपवल्या त्यांची नावे जाहीर करा असे सरकारला आवाहन केले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता गेली अनेक महिने लढा देत असलेले मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी दौरा सुरू केला आहे. शनिवारी महाबळेश्वर मार्गे मनोज जरांगे-पाटील पोलादपूर येथे आले. या ठिकाणी सायंकाळी त्यांचे जंगी स्वागत झाले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी किल्ले रायगडावर प्रस्थान केले. रविवारी किल्ले रायगडावर पायी चालत जात छ. शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांचा ताफा महाड कडे रवाना झाला. महाडमध्ये चवदार तळे येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी चौक येथे उपस्थित मराठा समाज बांधवांना मार्गदर्शन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना . मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठ्यांनी लढाया खूप लढल्या, मात्र मराठा आरक्षण ही लढाई आपल्यासाठी महत्वाची आहे. आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी शंभर टक्के आरक्षण मिळवून दिल्याशिवाय. मी गप्प बसणार नाही असे त्यांनी उपस्थित जनसमुदाय समोर ठणकावून सांगितले. मराठा आरक्षणाच्या या लढाईमध्ये एकजूट दाखवाल तरच लढाई जिंकू याकरिता सावध राहा असा सल्ला देखील. त्यांनी उपस्थित मराठा जनसमुदायाला दिला. यापूर्वी अनेक समित्या झाल्या, आयोग स्थापन झाले मात्र मराठा कुणबी नोंदी मिळाल्या नाहीत. सत्तर वर्ष या नोंदी कोणी लपवल्या यांची नावे देखील जाहीर व्हायला पाहिजेत असे आव्हान देखील जरांगे पाटील यांनी सरकारला केले
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हे पहिले आणि शेवटचे आंदोलन असेल आणि यात आपल्याला यश नक्की मिळेल असा विश्वास देखील मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. राज्यातील वेगवेगळ्या विभागात सापडणाऱ्या नोंदीनुसार त्याचा अहवाल तयार करून कायदा करून ओबीसीमध्ये आरक्षण दिले पाहिजे. मराठा समाजाने पक्ष आणि व्यक्ती पुजेतच वेळ घालवला. आता तरी सावध व्हा असा मोलाचा सल्ला मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी जमलेल्या जनसमुदायाला दिला.
छगन भुजबळांचे नाव न घेता टीका!
मनोज जरांगे पाटील यांनी उभ्या केलेल्या मराठा आरक्षणाच्या लढाईवर राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार टीका केली होती. याला उत्तर देताना मनोज जरांगे – पाटील यांनी छगन भुजबळ यांचे नाव न घेता केवळ एक म्हातारा असा उल्लेख करत हा माणूस आपल्याला विरोध करतोय. म्हातारा असल्याने वयाचा देखील आम्ही आदर करतो. प्रसिद्धीसाठी त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या मात्र आरक्षणाचा विजय क्षण आता जवळ येऊन ठेपलेला आहे असेत्यांनी सांगितले.
महाडमध्ये आलेले मनोज जरांगे पाटील यांची सभा दुपारी एक वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणार होती मात्र किल्ले रायगड पायी चालत गेल्याने आणि पायी चालत आल्याने उशीर झाला त्यामुळे एक वाजता होणारी सभा दुपारी साडेतीन वाजता सुरू झाली. यामुळे अनेक जण मनोज जरांगे पाटील येण्यापूर्वी घरी परतले. त्यातच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषक स्पर्धेतील अंतिम लढत आजच होत असल्याने तरुणांनी या सभेकडे पाठ फिरवलेली दिसून आली. मात्र राज्यातील सत्ताधारी भाजपा, शिंदे गट, राष्ट्रवादी या पक्षाचे मराठा समाजातील पदाधिकारी सोडता तालुक्यातील सत्ताधारी पुढार्यांना न जुमानणारा व सत्ताधाऱ्यांच्या पैशाला न हापापलेला गोरगरीब मराठा बांधव मात्र या सभेला आवर्जून उपस्थित होता.
