प्रतिनिधी
ठाणे : सत्कर्म आश्रम संचलित सत्कर्म बालकाश्रम यादवनगर, सोनिवली-एरंजाड रोड, बदलापुर (प) येथिल आश्रमातील मुलांसोबत रविवार दि. १२ नोव्हेंबर २०२३ रोजी आम्ही रायगडकर सेवा प्रतिष्ठान संघटनेतर्फे “आपुलकीची दिवाळी” साजरी करण्यात आली
सकाळी ठीक सात वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक अंबरनाथ आणि उल्हासनगर येथे महाराजांची पूजा करून सर्व शिवसेवक बदलापुर येथील आश्रमाकडे निघाले. आश्रमात पोहचल्यानंतर आश्रमाच्या आजुबाजुच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. आश्रमातील मुलांना आनंद मिळावा यासाठी संघटनेचे सेक्रेटरी शिवाजी पार्टे व इतर शिवसेवकांनी मनोरंजक गप्पागोष्टी, आपले आयुष्यातील अनुभव मुलांना सांगितले. पुढील आयुष्यात कसे ध्येय, उद्दिष्ट ठेवून ते कसे साध्य करता येईल ह्या संदर्भात चर्चा केली. काहींनी नृत्य सादर करून मुलांचे मनोरंजन केले तर तेथील मुलांनी प्रतापगडचा पोवाडा सादर करून सर्व वातावरण शिवमय करून मंत्रमुग्ध केले.

संघटनेच्या वतीने आश्रमातील मुलांना नवीन कपडे आणि दिवाळी फराळ वाटप करून आश्रम चालकांच्या मागणीनुसार कपडे धुलाई मशीन संघटनेचे संस्थापक मनोज पवार यांच्या हस्ते आश्रम चालकांना सुपुर्द करण्यात आली. या अभियानात अंबरनाथ, ठाणे, डोंबिवली, टिटवाला, उल्हासनगर, वांगणी, बदलापुर येथील सुमारे पन्नास शिवसेवकांनी सहभाग घेतला. संघटनेचे सेक्रेटरी शिवाजी पार्टे आणि खजिनदार नितेश चव्हाण यांनी विशेष मेहनत घेवून तसेच सर्व ठिकाणच्या शिवसेवकांनी मेहनत घेवून हा कार्यक्रम यशस्वी पार पाडला. देणगीदार आणि वस्तुरूपात देणगी दिलेल्या सर्व शिवसेवकांचे आभार आम्ही रायगडकर सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मंगेश गोविंद मोरे यांनी मानले.
