सलीम शेख
माणगाव : माणगाव ते गोरेगाव रेल्वे स्थानकादरम्यान कोकण रेल्वेच्या धडकेने मुगवली येथील २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच माणगावजवळ इंदापूर ते कोलाड दरम्यान स्टोन नंबर २०/२२ जवळ कोकण रेल्वेच्या धडकेत ४८ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार, दि. २३ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री ९:२० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेची खबर नितीन श्रीमंत बंडगर सध्या रा. कोलाड रेल्वे स्टेशन ता. रोहा यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेतील मयत प्रकाश कृष्णा डवले (वय-४८) रा. गंगेवाडी ता. माणगाव यांस कोकण रेल्वेची धडक लागून त्यामध्ये ते गंभीर जखमी होऊन ते मयत झाले. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजि. नं. ६०/२०२३ सीआरपीसी १७४ प्रमाणे करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश अस्वार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दोडकुलकर हे करीत आहेत.
