वैशाली कडू
उरण : महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेसाठी उरणमधील ‘पैशाने तुटली नाती’ व ‘कपट्टयम’ ही दोन नाटक सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६२वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२३-२४ ची प्राथमिक फेरी स्थळ डॉ. काशिनाथ घाणेकर (मिनी) नाट्यगृह ठाणे येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धा मंगळवार दि. २८ नोव्हेंबर २०२३ पासून सुरू होऊन दि. ४ जानेवारी २०२४ पर्यंत सुरू असणार आहे.
या स्पर्धेसाठी उरण ग्रामीण भागातील आई एकविरा सांस्कृतिक कलामंच, भेंडखळ यांच्या वतीने लेखक हसुराम पाटील, दिग्दर्शक पनेश्वर म्हात्रे यांचे ‘पैशाने तुटली नाती’ हे नाटक दि. मंगळवार दि. २८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर फ्रेंड्स सामाजिक कलामंच वतीने लेखक किरण घरत व दिग्दर्शक चंद्रविलास घरत यांचे ‘कपट्टयम’ हे नाटक बुधवार दि. ६ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता होणार आहे. तरी उरणमधील नाट्यरसिकांनी मोठया संख्येने सहभाग घेऊन नाटकास प्रोत्साहन द्यावेत.
या स्पर्धेसाठी उरण ग्रामीण भागातील दोन नाटक स्पर्धेसाठी सहभागी झाल्याने उरणकरांना याचा निश्चितच अभिमान वाटत असल्याचे नाट्यरसिक सांगत असून नक्कीच ते बक्षिसास प्राप्त ठरतील असा विश्वासही व्यक्त करीत आहेत.
