• जिल्हा नियोजन समितीमधून नागोठणे ग्रामपंचायतीला विविध विकासकामांसाठी निधी मंजूर
• शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
किरण लाड
नागोठणे : आगामी लोकसभा निवडणुकीत रायगड मतदार संघातुन भाकरी फिरवणार असे प्रतिपादन महाड विधानसभेचे शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी नागोठणे येथे शिवसेनेच्या पक्षप्रवेश कार्यक्रमाच्या वेळी केले.
ते पुढे असेही म्हणाले कि, आज सकाळपासुन तालुक्यातील विविध गावात जाऊन कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश करुन घेतोय. नागोठण्यात हा माझा चौथा कार्यक्रम आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येऊन फक्त आठ ते नऊ महिने झालेत परंतु या कालावधीत आमच्या सरकारनी सामान्य शेतकरी, कष्टकरी तसेच महिलांसाठी विविध शासकीय योजना मंजुर केल्या आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन आजारी माणसांसाठी उपचारासाठी ७२ कोटीची सहाय्यता करण्यात आलेली आहे. तसेच नागोठणे ग्रामपंचायतीला विविध विकास कामासाठी ५५ लाखाचा निधी तर नागोठणे विभागातील गावांना विविध विकासकामांसाठी ८८ लाखांचा निधी जिल्हा नियोजन फंडातुन दिला आहे. शेवटी शिंदे व फडणवीस सरकार हे लोकांसाठी अहोरात्र काम करणारे सरकार आहे. त्यामुळे आमच्या पक्षात पक्ष प्रवेश करण्याचा कार्यकर्त्यांचा ओघ वाढलेला आहे ही आमच्या सरकारच्या कामाची पावती आहे.

यावेळी दक्षिण रायगडचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर तसेच रोहा तालुकाप्रमुख मनोजकुमार शिंदे यांचेही भाषण झाले. या कार्यक्रमाच्या वेळी किल्ला ग्रामपंचायतीचे सरपंच योगेश बामुगडे, सदस्या सुषमा दळवी, अजय बामुगडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष, किल्ला गावातील प्रमुख कार्यकर्ते, महिला वर्ग तसेच पायरावाडी, वरची वाडी येथील असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितित शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी नागोठणे शिवसेनेचे विभागप्रमुख प्रविण ताडकर, मनोहर सुटे, नागोठणे शहरप्रमुख अमित खामकर, आकाश मढवी आदी शिवसेनेचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

नागोठणे शिवगणेश हाॅल येथे शिवसेनेने आयोजित केलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी नागोठणे विभागातुन मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश मोरे यांनी केले.
