विनायक पाटील
पेण : सीएफआय व बीएनवाय मेलन यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ गावांमध्ये ३५ क्लासेस सुरु करण्यात आले असून एकूण ८०० मुले व मुली सदर क्लासेसचा फायदा घेत आहेत. एका अनोख्या पद्धतीने हे क्लासेस गावांमध्ये सीएफआयचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आले.

मुलांची एकाग्रता वाढून त्यांची पाठांतर करण्याची क्षमता वाढावी याकरता अभ्यासासोबत आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी आणि मुलांना त्यांना आवडणाऱ्या गोष्टी करता याव्यात याकरिता क्लासेसमध्ये भारतीय सण, तसेच मुलांच्या व्यक्तिमत्व विकास वाढीसाठी विविध खेळ, चित्रकला, आर्ट्स आणि क्राफ्ट्स शिकविले जाते. तसेच यंदाच्या दिवाळी सुट्टीमध्ये मुलांसाठी पाढे पाठांतर, रांगोळी, पणती रंगवणे, चित्रकला, गोष्ट सांगणे, वाचन स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या आणि त्यामुळे सर्व मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून मुलांची एकाग्रता वाढून त्यांची अभ्यासात खूप चांगली प्रगती झाली आहे व होते आहे असे पालकवर्ग तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्तींकडून म्हटल जात आहे. त्यामुळे सर्व स्तरातून सीएफआय व बीएनवाय मेलन यांचे कौतुक केले जात आहे.