गणेश प्रभाळे
दिघी : पुण्यातील हडपसर येथून श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे जात असताना एर्टीगा कार चा अपघात होऊन सात जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी (ता. 30) सकाळी घडली.

सकाळी घडलेल्या या भीषण अपघातात कारमध्ये एकूण सहा प्रवासी प्रवास करत होते. यामधील चार जण जखमी असून त्यात एकाचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. हडपसर येथील पर्यटक एमएच 12 आरपी 8989 या कारने श्रीवर्धन येथे जात होते. पुणे-दिघी मार्गावर असणाऱ्या म्हसळा तालुक्यातील देवघर हद्दीत हा अपघात झाला. वळणावर वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार पलटी झाली.
म्हसळा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मेहता यांच्या टीमने तात्काळ उपचार केले. कारमध्ये दारूचे बॉक्स असल्याचे निदर्शनास आले. म्हसळा पोलीस अपघाताचा अधिक तपास करत आहेत.
