• Fri. Feb 20th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रोहे हादरले! पतीने कोयत्याने सपासप वार करून केला पत्नीचा खून

ByEditor

Dec 3, 2023

विश्वास निकम
कोलाड :
रोहा तालुक्यातील मौजे पाले खुर्द येथे पतीने पत्नीवर सपासप वार करत खून केल्याची घटना घडली असुन सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या खुनाच्या घटनेने रोहा तालुका हादरला आहे.

रोहा तालुक्यात कोलाड विभागातील मौजे संभे ग्रामपंचायत हद्दीतील मौजे पाले खुर्द येथे रविवारी (दि. ३) रोजी पहाटेच्या सुमारास चक्क पतीनेच पत्नीचा खून केल्याची घटना घडली. सदरच्या घटनेने परिसर तसेच तालुका पुन्हा एकदा हादरला आहे. घर बांधण्यावरील कर्जाचा वाद अखेर पत्नीच्या जीवावर बेतल्याचे समोर आले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

या विषयाची सविस्तर माहिती अशी की, मौजे पाले खुर्द येथील वैभव राम ठाकूर याने घर बांधकाम कर्जाच्या वादातून पत्नी विद्या हिच्यावर कोयत्याने सपासप वार करत तीला जिवे ठार केले. घडलेल्या या घटनेमुळे सबंध परीसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलिस निरीक्षक अजित साबळे यांनी ताबडतोब घटनास्थळी भेट देत आरोपीस ताब्यात घेतले. कोलाड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मौजे कोलाड येथील वैभव राम ठाकूर (३७) यांनी त्यांची पत्नी विद्या वैभय ठाकूर (३३) हिच्याशी घर बांधकामाच्या कर्जाचा वादातून पत्नीच्या कानावर तसेच डोक्यावर जोरदार वार करून तिला जीवेठार केले.

वरील तारखेस वेळी व ठिकाणी यांतील आरोपीत याने घर बांधण्यासाठी काढलेले कर्ज फेडण्यावरुन त्यांची पत्नी हिचे सोबत वाद झाल्याने त्या रागात आरोपीत याने लोखंडी कोयत्याने पत्नीचे उजव्या कानावर व त्याच ठिकाणी डोक्यामध्ये वार करुन ठार केले व सदर ठिकाणी फिर्यादी हे काय झाले हे पाहण्याकरीता गेले असता आरोपीत हे फिर्यादी यांचे अंगावर धावुन येवुन त्यास शिवीगाळी करुन आतमध्ये आलास तर तुला सुध्दा कोयत्याने ठार मारेन अशी धमकी दिली म्हणुन ११६/२०२३, भा. दं. वि. सं . कलम ३०२,५०४, ५०६ प्रमाणे नोंद झाली आहे तसेच कोलाड पोलिस निरीक्षक अजित साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई साळुंखे अधिक तपास करत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!