• Fri. Feb 20th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

श्रीवर्धन आगारातील एसटी वाहतुक विस्कळीत!

ByEditor

Dec 4, 2023

कमी उत्पन्नाचे कारण देत ‘मुंबई’ एसटीहि केली बंद
मुंबईसह भाईंदर, नालासोपारा, ठाणे उपनगरातील प्रवाशांमध्ये संताप

गणेश प्रभाळे
दिघी :
मागील दिवसांपासून श्रीवर्धन महामंडळाच्या भाईंदर, नालासोपारा, ठाणे या उपनगरात जाणाऱ्या एस.टी. फेऱ्या रद्द होत आहेत. आगाराकडून बोर्लीपंचतन विभागाला सुरळीत सेवा मिळावी अशी मागणी होत असताना त्यामध्ये मुंबईहून सायंकाळी ५ वाजता सुटणारी ‘मुंबई – बोर्लीपंचतन – श्रीवर्धन’ एसटी बंद झाल्याने प्रवाश्यांत संताप व्यक्त केला जात आहे.

गणपती, दिवाळी, अशा सणासुदीला परिवहन विभागाकडून मोठी सुविधा पुरविण्यात येते. त्यामुळे बारा महिने ग्रामीण भागाची लाईफ लाईन म्हणून एस.टीचा प्रवास सुरूच असतो. श्रीवर्धन आगारातुन नालासोपारा, भांडुप, ठाणे, तसेच राज्याच्या अनेक ठिकाणी बसेस जातात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुंबई तसेच अनेक शहरातील तेरा ते चौदा फेऱ्या रद्द केल्याने प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

मुंबईतील सगळी कामे आटपून सायंकाळी पाच वाजता बोर्लीपंचतनमार्गे श्रीवर्धन गाडीने येणाऱ्या दिघी परिसरातुन प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. ती बंद झाल्याने मुंबई सेंट्रल येथे रात्रीच्या दहानंतर सुटणाऱ्या एसटीची वाट बघत ताटकळत बसावे लागत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील काही परिसर असा आहे की एस. टी. ची वाट पाहिल्या शिवाय पर्याय नाही, अश्यांची फारच गैरसोय होते. त्यामुळे मुंबईहून सायंकाळी 5 सुटणारी एस टी श्रीवर्धन आगाराकडून सुरु करावी. अशी मागणी प्रवाशी वर्गाकडून होत आहे.

प्रवाशी नसल्याने मुंबई एसटी बस बंद करण्यात आली आहे, त्यामध्ये वाहक चालक संख्या सुद्धा कमी झाली आहे. जानेवारीमध्ये बंद केलेल्या बस पुन्हा सुरु केल्या जातील.
महेबुब मनेर, श्रीवर्धन आगार प्रमुख.

कित्येक वर्ष या मुंबई गाडीने आम्ही प्रवास करत आहोत. कामानिमित्त मुंबईत आल्यावर गावी जाण्यासाठी योग्य वेळेत सायंकाळी जाणारी गाडी बंद झाल्याने सहा तासांनी सुटणाऱ्या गाड्यांमुळे पोहचण्यास उशीर होत आहे.
नंदकिशोर भाटकर, प्रवासी बोर्लीपंचतन.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!