• Fri. Feb 20th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मांजरवणे येथील विवाहित महिलेचा सर्प दंशाने दुर्दैवी मृत्यू

ByEditor

Dec 4, 2023

उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यु झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

सलीम शेख
माणगाव :
तालुक्यातील मांजरवणे गावातील २४ वर्षीय विवाहित महिलेचा सर्प दंशाने उपचारादरम्यान माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवार, दि. ४ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजून १२ मिनिटांनी घडली. सदर घटनेतील महिलेचा मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला असून तशा प्रकारची तक्रार मयत महिलेचा दिर महेफुज म. अली हर्णेकर रा. मंजरवणे ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. या घटनेने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडुन महिलेच्या नातेवाईकांनी व जमावाने उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे जमुन उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला. वेळीच माणगाव व गोरेगाव पोलिस घटनास्थळी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल होवून त्यांनी परीस्थीती आटोक्यात आणली. पोलिसांनी नातेवाईकांची समज काढून त्यांना कायदेशीर मार्गाने जाण्याचा सल्ला दिला .

सदर घटनेबाबत अधिक वृत्त असे की, घटनेतील मांजरवणे गावातील विवाहिता दनिया हाशिम हर्णेकर (वय -२४) या महिलेला सोमवार दि. ४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता विषारी सर्पाने पायाला दंश केला. यानंतर तिला लगेचच तिच्या घरच्या मंडळींनी सकाळी ८: ३० वाजता माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी तिच्यावर औषधोपचार सुरू असताना दुपारी ३ वाजून १२ मिनिटांनी तेथील डॉक्टरांनी ती महिला मयत झाल्याचे घोषित केले. त्यांनतर सदर महिलेचे पती, आई, वडील, दिर व अन्य नातेवाईक यांनी ढसाढसा रडून उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांबद्दल संतप्त भावणा व्यक्त केल्या. पोलीस घटनास्थळी वेळीच दाखल झाल्याने पुढील बाका प्रसंग टळला. मयत महिलेचा मृतदेह सायंकाळी उशिरापर्यंत रुग्णवाहिकेत माणगावात होता. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईला नेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी देऊन शवविच्छेदनानंतर या महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे समजेल असे सांगितले.

सदर घटनेबाबत प्रसार माध्यमांजवळ बोलताना मयत महिलेचा दिर महेफुज हर्णेकर याने सांगितले की, उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आमच्या वहिनीचा मृत्यू झाला आहे. सकाळी ८:३० वहिनीला येथे आणल्यावर कोणीच डॉक्टर नव्हते. त्यांनतर ९:१५ वा डॉक्टर येवून त्यांनी उपचाराला सुरुवात केली. वहिनीची प्रकृती जास्त गंभीर झाल्याने येथील डॉक्टरांनी उशिरा दुपारी एम. जी. एम. हॉस्पिटलला घेऊन जा असे सांगितल्यावर आम्ही त्वरित रुग्णवाहिकेतून पुढे नेण्याचा निर्णय घेतल्यावर तोपर्यंत उपजिल्हा रुग्णालयातच वहिनीचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू येथील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याने त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी त्यांनी केली .
प्रभारी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय माणगाव यांनी प्रसार माध्यमांना माहिती देताना सांगितले की, घटनेतील रुग्ण महिला दानिया हाशिम हर्णेकर ही २४ वर्षीय महिला सर्प दंश झाल्याने सकाळी ९:१५ वाजता रुग्णालयात दाखल झाल्यावर फिजिशियन डॉक्टरांनी तिच्यावर लगेचच औषधोपचार सुरू केले. आवश्यक ती सर्व औषधे वापरण्यात आली परंतु तिच्याकडून तसा प्रतिसाद मिळाला नाही. तिच्यावर उपचार करीत असताना आम्ही वेळोवेळी तिच्या संबंधित नातेवाईकांशी बोलून तसे लिहून घेऊन त्यांची सही देखील घेतली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!